Join us  

'द गोल्डन थ्रेड'ने पटकावला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा सुवर्णशंख पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 10:32 PM

अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (मिफ्फ) सांगता सोहळा आज संध्याकाळी संपन्न झाला. या सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपट, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. निष्ठा जैन दिग्दर्शित 'द गोल्डन थ्रेड' या भारतीय चित्रपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी सुवर्ण शंख पुरस्कार पटकावला.

'द गोल्डन थ्रेड'मध्ये आर्थिक बदलाच्या ताकदीमुळे प्रभावित झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या अखेरच्या अवशेषांचे चित्रण आहे. एस्टोनियाचा वेरा पिरोगोवा दिग्दर्शित 'सावर मिल्क'ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय काल्पनिक लघुपट पुरस्कार मिळाला. प्रशस्तीपत्र, रौप्य शंख आणि पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यात आई आणि मुलामधील गुंतागुंतीचे नाते भावनाशीलतेने चित्रित केले असून, अशा नात्यांमधला कमालीच्या अपेक्षा आणि त्याबाबत होणारा भ्रमनिरास मांडणारे कथानक आहे. पोलंडच्या टोमेक पोपाकुल, कासुमी ओझेकी द्वारा दिग्दर्शित 'झीमा'ने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अॅनिमेशनपटाचा प्रशस्तीपत्र, रौप्य शंख आणि रोख पाच लाख रुपये असे स्वरूप असलेला पुरस्कार पटकावला. जपानच्या लियाम लोपिंटो दिग्दर्शित 'द ओल्ड यंग क्रो'ने सर्वात नाविन्यपूर्ण-प्रायोगिक चित्रपटासाठी एक लाख रुपये आणि मानचिन्ह असलेल्या प्रमोद पाटी पुरस्कारावर नाव कोरले. मॅट वॉल्डेक दिग्दर्शित 'लव्हली जॅक्सन'ला स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय स्पर्धा विभागामध्ये '६-ए आकाश गंगा' या निर्मल चंदर दंडरियाल दिग्दर्शित माहितीपटाने  सर्वोत्कृष्ट माहितीपट (६० मिनिटांपेक्षा जास्त) या प्रकारात चांदीचा शंख आणि पाच लाख रुपये पुरस्कार आपल्या नावे केला. बरखा प्रशांत नाईक दिग्दर्शित 'सॉल्ट' या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटाचा (३० मिनिटांपर्यंत) चांदीचा शंख आणि तीन लाख रुपये रोख असलेला पुरस्कार पटकावला. गौरव पाटी दिग्दर्शित 'निर्जरा'ला सर्वोत्कृष्ट भारतीय अॅनिमेशन चित्रपटाचा रौप्य शंख पुरस्कार मिळाला. जॉशी बेनेडिक्ट दिग्दर्शित 'अ कोकोनट ट्री'ने स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्कार पटकावला. मिफ्फमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणासाठी दिला जाणारा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार श्रीमोयी सिंग हिला 'अँड, टुवर्ड्स हॅपी प्लीज'साठी देण्यात आला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपटासाठी भारतीय माहितीपट निर्माते संघटना, आयडीपीएचा पुरस्कार 'चंचिसोआ'ला मिळाला. याचे दिग्दर्शन एलवाचिसा च संगमा आणि दीपंकर दास यांनी केले आहे. 'इंडिया इन अमृत काल'वरील सर्वोत्कृष्ट लघुपटाचा विशेष पुरस्कार एडमंड रॅन्सन दिग्दर्शित 'लाइफ इन लूम'ला मिळाला. 'धोरपाटन : नो विंटर हॉलिडेज' या नेपाळी चित्रपटासाठी बबीन दुलाल यांना सर्वोत्कृष्ट छायालेखक पुरस्कार, तर विघ्नेश कुमुलाई यांना 'करपरा' या भारतीय चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार मिळाला. 'द गोल्डन थ्रेड'साठी निरज गेरा यांना सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजक साउंड डिझायनर पुरस्कार देण्यात आला. सुरज ठाकूर यांना 'एंटँगल्ड'साठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्काराने गौरविण्यात आले. अभिजित सरकार यांना 'धारा का टेम (टाईम फॉर मिल्किंग)'साठी सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इरीन धर मल्लिक यांना 'फ्रॉम द शॅडोज'साठी सर्वोत्कृष्ट संकलकाचा पुरस्कार, तर विघ्नेश कुमुलाई यांना 'करपरा' या भारतीय चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संकलक पुरस्कार मिळाला.