Join us

देशाच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाचे उद्दीष्ट; एकनाथ शिंदेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 4:02 PM

तरुणांच्या हाताला काम दिले पाहिजे असे मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. 

मुंबई: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. याचपार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आज मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. 

युवा संवाद या कार्यक्रमाच्या आयोजनामागे शासनाची ठाम भूमिका आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या करिअरमध्ये मार्गदर्शन करण्याचा तसेच सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देशाच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्ष ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे. यापूर्वी राजभवनात पार पडलेल्या कार्यक्रमात १ लाख २५ हजार नोकऱ्यांचे करार केले गेले असून त्यातून ६० हजार लोकांना रोजगार दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. 

युवा पिढीच्या बळावर आपला देश महाशक्तीकडे वाटचाल करत असून संपूर्ण जगभरात आज भारताचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते. देशाची अर्थव्यवस्था ११व्या स्थानावरून ५व्या स्थानावर आणण्याचे काम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. जी२०चे अध्यक्षपद भारताला मिळणे ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. देशाचे भवितव्य तुमच्या हातात आहे असे युवकांना स्पष्ट करित तरुणांना चांगले विचार दिले पाहिजेत, तरुणांच्या हाताला काम दिले पाहिजे असे मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. 

दरम्यान, कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर नक्कीच मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने या शिबिराचे आयोजन केले आहे. सर्व ३६ जिल्हे आणि २८८ मतदारसंघांत विद्यार्थ्यांसाठी अशी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकारभाजपानोकरीकर्मचारी