लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या उपोषणामुळे प्रकृती नाजूक झाल्याने सध्या रुग्णालयात असलेले मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारचे शिष्टमंडळ येत्या दोन दिवसांत पुन्हा भेट घेणार आहे. या भेटीत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याबरोबर सरकारकडून लेखी मसुदा त्यांना दिला जाण्याची शक्यता आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांचा अवधी दिला आहे. सरकार आता या समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर काम करत असलेल्या न्या. शिंदे समितीचा कार्यकाळ २४ नोव्हेंबरला संपत असला तरी जरांगे पाटील यांनी २ जानेवारी २०२४ पर्यंतची वेळ सरकारला दिली आहे. त्यानुसार मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे. त्यानंतरही काही बाबी मागेपुढे होत असतील तर आम्ही जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना सर्व पुराव्यांशी माहिती देऊ, असेही सामंत यांनी सांगितले.
‘त्यांना’ बोलण्याचा नैतिक अधिकार नाही केवळ देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकारात्मक भूमिका घेतली. काही लोकांनी मराठा आंदोलनाला अश्लील व्यंगचित्र काढून बदनाम केले. अशा लोकांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला सामंत यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला.
अंतरवालीतील शेतकऱ्यांना भरपाईnअंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या जरांगे पाटील यांच्या सभेमुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा ४४१ बाधित शेतकऱ्यांना ३२ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. nमराठा समाजाने आतापर्यंत लाखोंचे मोर्चे शांततेत काढले होते. मराठा आंदोलक हिंसक नाहीत, परंतु त्यांच्याआडून कोणी राजकारण करत असेल तर ते तपासले जाईल.