मुंबई - शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि राज्यात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्व शिवसैनिकांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. मात्र हा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थावर होईल की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे. दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता असून, या मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या या याचिकेवर हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे.
विजयादशमी दिवशी मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथे होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा ही शिवसैनिकांसाठी पर्वणी असते. मात्र जून महिन्यात शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतरामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दावेदारी ठोकली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी कोणाला परवानगी द्यावी, असा यक्षप्रश्न मुंबई महानगरपालिकेसमोर पडला आहे.
दरम्यान, आधी अर्ज दाखल करूनही दसरा मेळाव्यासाठी महानगरपालिकेने परवानगी न दिल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. तसेच दसरा मेळावा शिवतीर्थावर आयोजित करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. बीएमसीच्या जी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांविरोधात शिवसेना कोर्टात गेली आहे या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असं विधान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.