सरकार म्हणते हा ‘बेस्ट’चा नाही तर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 06:56 AM2023-08-08T06:56:16+5:302023-08-08T06:56:25+5:30
सरकार विचारत नाही, कंपनीने ठोकल्या नोटिसा; ७९८ बसेस आगारातच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी पुकारलेला बेमुदत संप आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. ‘समान काम, समान वेतन’ द्या, बेस्ट उपक्रमाच्या सेवेत कायमस्वरुपी सामावून घ्या, या मागणीसाठी बेस्टच्या कंत्राटी चालक व वाहकांनी पुकारलेले आंदोलन मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विविध बस आगारात ७९८ गाड्या आगाराबाहेर न पडल्याने प्रवाशांची कोंडी झाली.
बेस्ट कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी समन्वय समितीचे प्रतिनिधी विकास खरमाळे यांनी सांगितले की, डागा ग्रुप, हंसा, मातेश्वरी, टाटा, ओलेक्ट्रा, स्विच मोबॅलिटी या कंपन्यांत चार वर्षांपूर्वी चालक म्हणून सेवेत रूजू झालो. सेवेत येण्याआधी करार केला, त्यावेळी २२ हजार ५०० रुपये वेतन देण्यात येईल, असे करारात नमूद केले होते. मात्र, प्रत्यक्षात १७ हजार रुपये पगार हातात दिला जातो. साप्ताहिक सुटी वेळेत मिळत नाही. त्यामुळे आमची एक प्रकारे फसवणूक होत आहे. ३० दिवसांपैकी २६ दिवस कामावर हजर राहावे लागते. नादुरूस्त बसेस चालवाव्या लागतात. गेल्या चार वर्षांपासून आम्ही आमच्या हक्कासाठी लढा देत आहोत. आम्हाला बेस्टच्या सेवेत कायम करून घ्या, ‘समान काम समान वेतन’ या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप सुरू राहणार, असे खरमाळे यांनी सांगितले.
दादरमध्ये मोर्चा
सहा दिवसांपासून कंत्राटी कामगारांचा संप सुरूच आहे. या आंदोलनाला संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने पाठिंबा दिला आहे. सोमवारी दादर येथे मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार, असे युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.
बेस्टच्या मदतीला १२२ एसटी
संपामुळे बेस्ट उपक्रमाने एसटीला मदतीसाठी साद घातल्याने सोमवारी एसटी महामंडळाच्या १२२ बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावल्या. एसटीकडे १५० बसेसची मागणी केली आहे, त्या उपलब्ध होतील, तशा बेस्ट प्रवाशांच्या सेवेत धावतील, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
कामगारांवर मेस्मा लावणार
कंत्राटी कामगारांशी चर्चा करून संपावर तोडगा काढा, अशी सूचना बसेसचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना करण्यात आली आहे. कंपनी किंवा कंत्राटी कामगारांवर मेस्मा लावायचा की नाही, यासाठी कायदेविषयक सल्ला घेत असल्याचे बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी सुनील वैद्य यांनी सांगितले.
तोडग्यासाठी पालकमंत्र्यांची मध्यस्थी
मुंबई : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मागील सहा दिवस मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरू असताना त्याकडे ढुंकूनही न बघणाऱ्या सरकारला सहाव्या दिवशी या संपाबाबत जाग आली. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संपात मध्यस्थी केली असून २४ ते ४८ तासांत हा संप मिटेल, अशी ग्वाही दिली आहे. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे सांगत लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर येण्याचे आवाहन लोढा यांनी केले असून कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, असे आश्वासनही दिले आहे. मुंबईकरांना या संपामुळे त्रास झाल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. बेस्टचे कंत्राटी कर्मचारी पगारवाढ आणि सोयी- सुविधा मिळत नसल्याने संपावर गेले आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांना कंपनीने नोटीस बजावल्याने कर्मचारी आणि कंपनीमधील वाद आणखी चिघळला आहे.
काय म्हणाले लोढा...
हा बेस्टचा संप नाही, जो संप आहे तो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांच्या अनेक मागण्या आहेत. आज बैठक झाली, उद्या पुन्हा एक बैठक होणार आहे. त्यांच्या योग्य आहेत, त्यांना न्याय मिळावा ही सरकारची भूमिका आहे, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.
किमान वेतनानुसार वेतन द्यावे, असे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. दिवाळी बोनस व इतर मागण्यांवर चर्चा झाली आहे.
बेस्टने १,६७१ बस भाडे तत्त्वावर घेतलेली आहे. संपामुळे त्यातील ४०० बस रस्त्यावर नाहीत. त्यावर तोडगा म्हणून स्कूल बस आणि खासगी बसला आणि खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली
आहे. एसटीच्या ही काही बस घेण्यात आल्या आहेत.