Join us

न्यू दिंडोशीच्या उद्यानात चेंडू काढतांना विजेचा शॉक लागून मृत मुलाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी शासनाने समिती नेमावी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 6:16 PM

आमदार सुनील प्रभू यांची मागणी

मुंबई-न्यू दिंडोशीच्या मीनाताई ठाकरे उद्यानात रविवारी दुपारी क्रिकेटची मॅच सुरू होती.यावेळी चेंडू रेलिंग पलीकडे गेला असतांना चेंडू काढतांना विजेचा शॉक लागून ११ वर्षीय दिंडोशी संतोष नगर मध्ये राहणाऱ्या आदिल चौधरी या मुलाचा दुदैवी मृत्यू झाला.प्राथमिक तपासात मुलाचा मृत्यू विद्युत प्रवाहामुळे झाल्याचा संशय आहे.दिंडोशी पोलिसांनी या दुर्घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून याप्रकरणी पोलिस चौकशी करत आहे.

या संदर्भात लोकमतच्या आजच्या अंकात चेंडू काढतांना शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू असे वृत्त प्रसिद्ध झाले होते.उद्धव सेनेचे मुख्य प्रतोद,दिंडोशीचे स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेतली.आज विधानसभेत माहितीच्या मुद्याद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने चौकशी समिती नेमावी आणि या मुलाचे वडील बद्रेलाम चौधरी यांच्या मागणीनुसार त्यांच्या मुलाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करून त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून या मृत मुलाच्या कुटुंबीयाला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी देखिल आपण विधानसभेत केल्याची माहिती आमदार सुनील प्रभू यांनी लोकमतला दिली. 

टॅग्स :सुनील प्रभू