Join us  

सरकारने आतातरी गांभीर्याने विचार करावा, अपघातानंतर अजित पवारांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 2:03 PM

समृद्धी महामार्गावर झालेला अपघात हा गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या अपघातामधील मोठा अपघात आहे.

मुंबई - Ajit Pawar on Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. यानंतर आता यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेवर भाष्य करताना, अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात, असे म्हणत सरकारला लक्ष्य केले.  तर, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या अपघाताच्या मालिकेवरुन सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे. 

समृद्धी महामार्गावर झालेला अपघात हा गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या अपघातामधील मोठा अपघात आहे. या महामार्गाच्या उद्घाटनापासून येथे सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे, सरकारने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच, सरकारने तातडीने या अपघातांच्या संदर्भात तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मार्ग काढावा, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे. घडलेली घटना अतिशय दु:खद असून सर्व पीडित कुटुंबीयांप्रति अजित पवार यांनी सहवेदनाही व्यक्त केल्या आहेत. तसेच, खराब हवामानामुळे मला हेलिकॉप्टरने घटनास्थळी जाता येणार नाही. मात्र, मी खासगी विमानाने तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.  

समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं  विचार करावा, अशी मागणीही पवार यांनी केलीय. 

काय म्हणाले संजय राऊत

समृद्धीवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. २५ लोक ज्या पद्धतीने मरण पावले हे दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला त्याच्या खोलात जावे लागेल. ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने निर्णय केले. त्या अनेक गोष्टी तपासाव्या लागतील. भविष्यात त्या सर्व गोष्टी समोर येतील. दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, लोक मृत्यू होत आहेत हे काही चांगले नाही, किती वेळा श्रद्धांजली वहायच्या, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्यावतीने पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दुसरीकडे,  या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाखांची मदत दिली जाणार आहे आणि जखमींना ५० हजारांची मदत केली गेली आहे. 

टॅग्स :मुंबईअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेससमृद्धी महामार्गअपघात