Join us

मंत्रालयात प्रवेशासाठी सरकारच्या जाचक अटी, नागरिकांच्या रांगा; वडेट्टीवारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 4:28 PM

मंत्रालयात येऊन जाळीवर उड्या घेऊन नागरिकांनी आंदोलन केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.

मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यामध्ये, राज्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासंदर्भात आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत एकमताने ठराव संमत करण्यात आला. एकीकडे आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असताना दुसरीकडे मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या अडचणींवरुन आता विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयाबाहेर सर्वसामान्य नागरिकांच्या रांगा लागत असून सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने मंत्रालयातील प्रवेशासंदर्भात घेतलेल्या अटी जाचक असल्याचं म्हटलंय.   

मंत्रालयात येऊन जाळीवर उड्या घेऊन नागरिकांनी आंदोलन केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मध्यंतरीही मंत्रालयातील जाळीवर उड्या मारुन विविध मागण्यांसाठी आंदोलने करण्यात आल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून, बातम्यांमधून दिसून आले. त्यानंतर, मंत्रालयीन प्रवेशासाठी राज्य सरकारच्यावतीने काही अटी व शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, आता सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयाची वाट अवघड बनली आहे. त्यातच, गावाकडून मुंबईत येणाऱ्या नागरिकांना आर्थिक भार तर सोसावाच लागतो, पण मंत्रालयात प्रवेशच नाही मिळाल्यास हताश होऊन घरची वाट धरावी लागते. त्यामुळे, नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कामे होत नसल्याचा पुरावा आहे. शासन आपल्या दारी’ कार्यक्रम अपयशी ठरल्यानेच मंत्रालयाबाहेर नागरिकांच्या रांगा दिसत आहे. परंतु, शासनाने जनतेची तिथेही अडवणूक केली. मंत्रालयात होत असणाऱ्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला असून मंत्रालय प्रवेशासाठी जाचक नियम बनवले आहेत, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.  मंत्रालयात प्रवेश मिळण्यासाठी अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. सुरक्षेची कारणे देत सर्वसामान्यांना मंत्रालयाबाहेर ताटकळत उभे केले जात आहे. त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत नागरिक ताटकळत उभे राहतात. सायंकाळी प्रवेश मिळाल्यावर कार्यालयीन कामकाजाची वेळ संपते. त्यामुळे हताश होऊन नागरिक परत जात आहेत. नागरिकांचे हाल सरकारने थांबविले पाहिजेत. शासन आपल्या दारी उपक्रमावर कोट्यवधी रुपये खर्च या सरकारने केला आहे. या उपक्रमात जनतेची कामे झाली असती तर त्यांना मंत्रालयापर्यंत येण्याची गरज पडली असती का?, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.  

टॅग्स :विजय वडेट्टीवारमुंबईमंत्रालय