सरकार बदलले, आणि बीडीडी चाळीला लागला ब्रेक; संक्रमण शिबिर आणि इमारती रिकाम्या करण्याचे आव्हान

By सचिन लुंगसे | Published: July 22, 2022 09:20 AM2022-07-22T09:20:07+5:302022-07-22T09:21:01+5:30

सत्ता बदलल्यामुळे बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकास प्रक्रियेला ब्रेक लागला असून, आता तर काम बंदच झाल्याने रहिवासी बुचकाळ्यात पडले आहेत.

the govt changed and the bdd chawl redevelopment came to a halt challenges of evaluating transit camps and buildings | सरकार बदलले, आणि बीडीडी चाळीला लागला ब्रेक; संक्रमण शिबिर आणि इमारती रिकाम्या करण्याचे आव्हान

सरकार बदलले, आणि बीडीडी चाळीला लागला ब्रेक; संक्रमण शिबिर आणि इमारती रिकाम्या करण्याचे आव्हान

googlenewsNext

सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात झालेल्या सत्तांतराचा फटका करी रोड येथील ना. म. जोशी मार्गावरील बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाला बसला आहे; कारण सत्ता बदलल्यामुळे बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकास प्रक्रियेला ब्रेक लागला असून, आता तर काम बंदच झाल्याने रहिवासी बुचकाळ्यात पडले आहेत. सत्ता बदलामुळे येथील काम पुन्हा वेगाने कधी सुरू होईल? याबाबत कोणी काहीच बोलत नसल्याने पुढील चित्र अस्पष्ट आहे. विशेष म्हणजे म्हाडाला हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करावयाचा आहे. मात्र, पात्रता निश्चित होण्यासह संक्रमण शिबिर मिळण्यापासून ते चाळी रिकाम्या करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत सातत्याने अडथळे येत आहेत. तसेच पुनर्विकासातील दिरंगाईमुळे स्थानिक परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ना. म. जोशी मार्गावरील स्थलांतरणाची प्रक्रिया धिम्या गतीने सुरू आहे. आता तर प्रक्रियाच बंद झाली आहे. सद्य:स्थितीमध्ये अकरा क्रमांकाची चाळ पाडण्यात आली आहे. बारा नंबरच्या चाळीमध्ये आठ पोलिसांची कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. तीस नंबर चाळ रिकामी केली आहे, पण या चाळीमध्येदेखील दोन ते तीन भाडेकरू आहेत. शिवाय चार चाळी अशा आहेत की तेथील रहिवाशांची पात्रता झाली आहे. त्यांना तीन वर्षे झाले संक्रमण शिबिर मिळाले आहे. मात्र, या चाळीदेखील रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत. कामाची गती अशीच राहिली तर पुनर्विकासाला किती वर्षे लागतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तीन चाळी पाडायला कित्येक दिवस लागत आहे, तर चार चाळींचे काम कधी होणार. पाच वर्षांत प्रकल्प कसा पूर्ण होणार? असे अनेक सवाल रहिवाशांनी उपस्थित केले आहेत.

काम सुरू पण...

शिवसेना-भाजप सरकार असताना हा प्रकल्प आला. हे काम सुरू असतानाच आघाडी सरकार आले. तेव्हा एक वर्षे काम थांबले. नंतर काम सुरू झाले, मात्र तोवर सत्तांतर झाले. तीन चाळी पाडायला इतके दिवस लागत आहेत, तर चार चाळींचे काम कधी होणार असा सवाल केला जात आहे. ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात कामाने वेग पकडलेला नाही.

- एकूण चाळी ३२ आहेत.

- १० चाळींचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले.

- १० पैकी एक चाळ पाडण्यात आली. दोन चाळी रिकाम्या करण्यात आल्या आहेत. त्या पाडण्यात आलेल्या नाहीत.

- उर्वरित चार चाळींत आहेत त्यांना संक्रमण शिबिर देण्यात आले आहे. मात्र, त्या रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत.

- शिवाय तीन चाळी अशा आहेत ज्यांची अंतिम पात्रता निश्चित झाली आहे. मात्र, त्यांना संक्रमण शिबिर देण्यात आलेले नाही.

- ११ क्रमांकाची चाळ पाडण्यात आली. त्यातील ८० कुटुंबांना लोअर परळ येथे स्थलांतरित करण्यात आले.

- १२  नंबर चाळ येथील ७२ कुटुंबे स्थलांतरित झाली. ८ खोल्या रिकाम्या झालेल्या नाहीत. यांचे म्हणणे असे आहे, खोलीचा करारनामा त्यांच्या नावाने झाला पाहिजे. म्हाडाने अजून ते त्यांच्या नावाने दिलेले नाही.

- ३० क्रमांकाची चाळ रिकामी झाली आहे. ७७ खोल्या रिकाम्या झाल्या आहेत. तीन खोल्या रिकाम्या होणे बाकी आहे.

- उर्वरित चार चाळींत १२५ कुटुंबे आहेत. येथील रहिवाशांची पात्रता निश्चित झाली आहे. त्यांना संक्रमण शिबिर देण्यात आले आहे. मात्र, दोन वर्षे झाले काहीच कार्यवाही झालेली नाही.

- १३, १४ आणि १५ चाळींना संक्रमण शिबिर देण्यात आलेले नाही. त्यामुळे या चाळी रिकाम्या झालेल्या नाहीत. तिन्ही चाळी मिळून २४० कुटुंबे आहेत.

कार्यवाही केली पाहिजे

चार चाळींमधील रहिवाशांना प्रकाश कॉटन, वेस्टर्न इंडिया येथे संक्रमण शिबिर देण्यात आले आहे. मात्र, मूळ चाळी रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत. म्हाडाने ही कार्यवाही केली पाहिजे. मात्र, म्हाडाचे अधिकारी लक्ष घालत नाहीत. कामाची, घराची शाश्वती मिळत नसल्याने रहिवासी घरे रिकामी करण्यास तयार नाहीत.

करारासाठी प्रतिसाद नाही

रहिवासी करार करण्यासाठी प्रतिसाद देत नाहीत. लॉटरी झाली. पात्रता ठरविली. कोणत्या इमारतीमधील कोणत्या रहिवाशांनी नोंदणीसाठी यायचे याची तारीख आणि वेळदेखील ठरविली. मात्र, रहिवासी फिरकत नाहीत. रहिवाशांकडून सहकार्य अपेक्षित आहे. मात्र विरोधाचे कारण समजत नाही.  एक इमारत रिकामी झाली आहे. एक इमारत बाकी आहे; त्यात पोलिसांची आठ कुटुंबे राहत आहेत. घरांची किंमत निश्चित झालेली नाही म्हणून येथे विरोध होत आहे.  कागदपत्र नोंदणी मधला सहभाग नगण्य असता कामा नये. थोडक्यात काम कुठेही थांबलेले नाही. काम सुरू आहे. - डॉ. योगेश म्हसे, मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा

स्वप्ने बाळगली

बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासाचे काम वेगाने व्हावे, असे आमचे म्हणणे आहे. आतापर्यंत रहिवाशांनी प्रत्येक कामात सहकार्य केले आहे. म्हाडानेदेखील सहकार्य केले आहे. मात्र, सत्तांतराचा फटका बी.डी.डी. चाळींमधील रहिवाशांना बसू नये. कारण गेल्या कित्येक वर्षांनी चाळीमधील पिढ्यांनी नव्या घराची स्वप्ने उराशी बाळगली आहेत. - कृष्णकांत नलगे, अध्यक्ष, ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समिती

Web Title: the govt changed and the bdd chawl redevelopment came to a halt challenges of evaluating transit camps and buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई