लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लहान भाऊ जास्त मोठेपणा करत असल्याच्या रागात मोठ्या भावानेच हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार कुलाबा पोलिसांच्या चौकशीत समोर आला आहे. कुलाबा पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोठ्या भावासह चार जणांना अटक केली आहे. या हल्ल्यात नागपाडा परिसरातील इमरान युनूस नमकवाला (४०) जखमी झाले आहेत. कुलाबा पोलिसांनी इमरान यांचा मोठा भाऊ इरफान युनूस नमकवाला (४५) याच्यासह इस्लाम असलम कुरेशी (३४), सलीम मन्सूर शेख (२३) व्यावसायिक सुपारी किलर लोकेंद्र उदयसिंग रावत उर्फ लौकी उर्फ रॉकी उर्फ साजन सिंह उर्फ थापा उर्फ नेपाळी (२८), इरफान युनूस नमकवाला (४५) या चौघांना अटक केली आहे.
- इमरान यांचा मित्र तारीक अजीज वकील अहमद रेशमवाला यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
- ३१ जुलै रोजी इमरान हे मित्र तारिक सोबत कारने रिगल जंक्शनच्या दिशेने जात असताना, दुपारी दोनच्या सुमारास गाडीच्या चाकाची हवा चेक करण्यासाठी जहांगीर आर्ट गॅलरी या ठिकाणी थांबले. त्यांच्या मागावर असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने सपासप वार केले.
अडीच लाखांची सुपारी
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्यांनी फिल्मी स्टाइलने शिवडीतून इस्लाम याला अटक केली. त्याच्या चौकशीतून सलीम आणि रावतला अटक केली. रावत हा सुपारी किलर असून त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, हत्येसारख्या गुन्ह्यात शोध सुरु आहे.
आठवडाभर पाठलाग करत केली अटक
- आठवडाभर त्याचा पाठलाग करत विरारमधून त्याला अटक केली आहे.
- चौकशीत, इमरान यांचा मोठा भाऊ इरफान यानेच हत्येची सुपारी दिल्याचे समोर येताच त्यालाही अटक करण्यात आली.
- इरफानच्या चौकशीत, लहान भाऊ सतत मोठेपणा करत असल्याच्या रागात अडीच लाखांची सुपारी दिल्याचे सांगितले.
- तारिक यांनी इमरान यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच कुलाबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
- वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय हातीसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी विनायक पाटील, ज्ञानेश्वर कांडेकर, हनमंत नलवडे, विजय भोर, सर्जेराव कांबळे, आसिफ काझी यांनी ही कारवाई केली आहे. गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.