मुंबई : जानेवारीच्या पंधरवड्यात २० हजारांवर पोहोचलेली रुग्णसंख्या आता हळूहळू पाच हजारांवर आली आहे. त्यामुळे कोविडची तिसरी लाट लवकरच ओसरण्याची चिन्हे असल्याने मुंबईतील काही निर्बंध लवकरच शिथिल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र तूर्तास केवळ उद्यान-मैदानांचे द्वार ठरावीक वेळेत नागरिकांसाठी खुले करण्याबाबत महापालिकेचा विचार सुरू आहे.२१ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईत कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला. कोविडचा नवीन प्रकार ओमायक्राॅनचा प्रसार वेगाने होऊ लागल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे सक्रिय रुग्ण एक लाखांवर पोहोचले. मात्र यापैकी ९० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसल्याने दिलासा मिळाला. मात्र खबरदारीसाठी मुंबईत पुन्हा काही निर्बंध लागू करण्यात आले होते. आता कोविडची दररोजची रुग्णसंख्या पाच हजारांवर तर रुग्णालयात दखल रुग्णांची संख्या केवळ १२ टक्के एवढी आहे.यासाठी उघडणार उद्यान-मैदानांचे द्वार...मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असली तरी अद्याप काही दिवस महापालिका दररोजच्या रुग्णसंख्येवर लक्ष ठेवणार आहे. ही घट अशीच कायम राहिल्यास काही निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकारमार्फत निर्णय घेण्यात येतील. त्याची महापालिका पातळीवर अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या मुंबईतील शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर उद्याने व मैदाने सकाळी व सायंकाळी काही तासांसाठी खुली करण्यात येणार आहेत. कोविड काळात नागरिकांची प्रकृती उत्तम राहण्यासाठी, त्यांना मोकळा श्वास घेता यावा, प्रभातफेरी, व्यायाम करता यावे, यासाठी उद्याने खुली असणे आवश्यक आहे. मात्र लग्न समारंभ, व्यायामशाळा, चित्रपटगृहांमध्ये असलेला ५० टक्के उपस्थितीचा नियम आणखी काही काळ कायम राहील, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मैदाने-उद्याने लवकरच होणार खुली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 9:50 AM