मुंबई : राज्यात आता सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला आहे, मागील काही वर्षांत पर्यटनाची पारंपरिक संकल्पना बदलते आहे. विशेषत: कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर आता केवळ पर्यटन म्हणजेच फिरणे आणि खाणे एवढे मर्यादित राहिलेले नाही. तर यापलीकडे जाऊन आता पर्यटक ‘एक्सिपिरिअन्स टुरिझम’ला पर्यटकांकडून पसंती मिळते असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दिली आहे.याविषयी अधिक माहिती देताना पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी सांगितले, पर्यटकांची आवड लक्षात घेऊन पर्यटन विकास महामंडळ त्याप्रमाणे नवनवे उपक्रम राबवित आहे. त्यातून पर्यटकांचा पर्यटनाचा अनुभव अधिक अविस्मरणीय, अनुभव सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.
पर्यटकांकडून या अनुभवाला ‘लाइक्स’ वन सहवास, माती काम, दुर्गभ्रमंती, जंगल भ्रमंती, तलावाच्या काठी राहणे, गिर्यारोहण, गावकऱ्यांसोबत एक दिवस स्थानिक खाद्यपदार्थांची चव चाखणे, स्पाॅट द शेकरू उपक्रम, अवकाश निरीक्षण, भात लावणी- काढणी, विटी-दांडू-लगोरी खेळ खारफुटी जंगलांची सफर, रापण करणे, हस्तकला, स्थानिक बाजारपेठांना भेटी देणे, स्थानिक कलाकारांकडून कलेचे प्रशिक्षण घेणे इ. उपक्रमांना पर्यटकांकडून अधिक पसंती मिळत आहे.
पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांना शहरी जीवनशैलीचा विसर पडून ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव यावा, या दृष्टिकोनातून उपक्रम डिझाइन केले आहेत. कृषी पर्यटन, साहसी पर्यटन आदी पर्यटनाच्या नवीन संकल्पना जनमानसात दृढ व्हाव्यात या दृष्टिकोनातून राज्य पर्यटन महामंडळामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्याच्या मातीची, संस्कृतीची व परंपरेची विविधांगी ओळख व्हावी आणि पर्यटनापेक्षा वेगळी अनुभूती पर्यटकांना मिळत आहे.