Join us

...त्यादिवशी BMC तील पालकमंत्री कार्यालय बंद करू; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 10:15 AM

महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्यांचे कार्यालय उघडल्यामुळे विरोधी ठाकरे गटासह काँग्रेसने भाजपावर टीका केली होती.

मुंबई – अलीकडेच मुंबई महापालिकेत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावाने कार्यालय उघडण्यात आले होते. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्यांचे कार्यालय उघडल्यामुळे विरोधी ठाकरे गटासह काँग्रेसने भाजपावर टीका केली होती. मुंबई महापालिकेच्या अधिकारावर शासनाकडून गदा आणली जात आहे असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत भाष्य करत पालकमंत्री कार्यालय बंद करणार असल्याची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज नगरसेवक नाही, पक्षांची कार्यालये तिथे नाहीत. आलेले नागरीक तिथे तक्रारी घेऊन येतात त्यांच्यासाठी महापालिकेत जागा असावी यासाठी हे कार्यालय बनवले आहे. ज्यादिवशी मुंबई महापालिकेचं लोकप्रतिनिधी परत येतील त्यादिवशी पालकमंत्री कार्यालय बंद करण्यात येईल. उपनगरात कार्यालय आहे, ते जनता दरबार घेतात, प्रत्येक वार्डात पालकमंत्री जातात असं म्हणत मंगलप्रभात लोढा यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

आदित्य ठाकरेंनी केली होती टीका

महापालिका कायदा १८८८ नुसार मुंबई महापालिका स्वतंत्र प्राधिकरणानुसार कार्यरत आहे. या कायद्याची पायमल्ली केली आहे. पालकमंत्र्यांचा थेट संबंध जिल्हाधिकाऱ्यांशी येतो. पण महापालिकेत पालकमंत्र्यांना केबिन देऊन मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या कामात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न शिंदे सरकारचा सुरू झालाय. बिल्डिंग प्रपोजलच्या कामासाठी मंत्र्यांना केबिन दिली जात असतील तर माझी मागणी आहे की, प्रत्येक महापौरांना मंत्रालयात केबिन द्या. आम्हा मुंबईच्या सगळ्या आमदारांना महापालिकेने केबिन द्यावी अशी मागणी करत आदित्य ठाकरेंनी टीका केली होती.

तर ही बाब स्वायत्त संस्थेवर अतिक्रमण असल्याचा मुद्दा काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांच्या या कार्यालयात भाजपाचे माजी नगरसेवक बसणार असून त्याची यादी जाहीर करण्यात आल्याचे सांगत हा पायंडा चुकीचा आहे. यातून तिथे राजकारण होत असून व्यवस्थेची मोडतोड करण्याचे काम भाजपा करतंय असा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीने केला होता.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमंगलप्रभात लोढाकाँग्रेसआदित्य ठाकरे