Join us

"बैठकीतील पाहुण्यांना मेजवाणी नाही, तर झुणका भाकर, वडापाव अन् पुरणपोळी"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 5:50 PM

मंत्री उदय सामंत म्हणाले की, इंडिया आघाडीची बैठक १४-१५ तासांचा इव्हेंट आहे.

मुंबई - देशातील विरोधकांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला आज मुंबईत सुरुवात झाली आहे. या बैठकीवरुन काँग्रेस, शिवसेनेसह सर्वच विरोधक एकत्र आले आहेत. तर, त्यांच्या आघाडीला विरोध करण्यासाठी एनडीएनेही बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी एनडीएतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या नाावरुन टीका केली. देशाच्या नावाचा राजकारणासाठी उपयोग करणे याशिवाय दुसरे दुर्दैव नाही, असे ते म्हणाले. तसेच, मुंबईत बैठकीसाठी आलेल्यांसाठी वारेमाप खर्च केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

मंत्री उदय सामंत म्हणाले की, इंडिया आघाडीची बैठक १४-१५ तासांचा इव्हेंट आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा आम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलो वैगेरे आरोप आमच्यावर केले गेले. मुंबईबद्दल इंडिया आघाडीच्या बैठकीत अँलर्जी आहे. कुणी कुठे कार्यक्रम करावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण, मुंबईतील जुन्या खुर्च्या या लोकांना नको होत्या. म्हणून ४५ हजारांची एक खुर्ची अशा ६५ खुर्च्या नवीन घेण्यात आल्या. त्यामुळे १४ तासांसाठी एका नेत्याला बसायला ४५ हजारांची खुर्ची घेतली जाते, असे सामंत यांनी सांगितले. तर जेवणाचं एक ताट ४५०० रुपयांचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. आता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जेवणाचा हा बेत मराठमोळ्या स्टाईल असून ही मेजवाणी नसल्याचं म्हटलं आहे. 

राज्यात दुष्काळाची परिस्थीती आहे याची आम्हाला जाणीव आहे, देशभरातून इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेनुसार केले जाणार आहे. झुणका भाकर, वडापाव व पुरणपोळी हे महाराष्ट्राचे खाद्यपदार्थ जेवणात असणार आहेत, ही मेजवानी कशी? राज्यात दुष्काळी परिस्थितीला तिघाडी सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले. तसेच, मनसेनं केलेल्या मेजवाणी टीकेलाही या माध्यमातून उत्तर दिले. 

४५०० रुपयांचे एक ताट

बैठकीसाठी आलेल्यांची राहण्याची सोय करण्यासाठी ६५ खोल्या बुक केल्या आहेत. त्या लॉजिंग बोर्डिंगमधील नाही तर फाईव्ह स्टारमधील आहेत. मराठमोळ्या जेवणाची व्यवस्था ताटाला ४५०० हजार रुपये. खोलीची किंमत २५-३० हजार रुपये आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेला पक्षातील आमदार हॉटेलला राहिले तेव्हा आमच्यावर टीका केली गेली. आता १४ तासांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. या लोकसभा निवडणुकीनंतर हे सगळे बेरोजगार होणार आहेत, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना लगावला. 

टॅग्स :काँग्रेसनाना पटोलेभारतराष्ट्रीय लोकशाही आघाडी