Join us

बाळाचा हात गेला, त्यात कोणाचाही हात नाही..? उद्विग्न बापाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 5:57 AM

तुमचेच डॉक्टर, तुमचीच चौकशी समिती, मग वेगळा काय अहवाल येणार? असा उद्विग्न सवाल त्या चिमुकल्याचे वडील राहुल चव्हाण यांनी केला आहे.

- संताेष आंधळे

मुंबई : के. ई. एम. रुग्णालयात मुदतपूर्व प्रसूतीत जन्माला आलेल्या ५२ दिवसांच्या बाळाच्या हाताला गँगरीन होऊन त्याचा हात कापावा लागला होता. याची चौकशी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नेमलेल्या चार तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने, कोणताही निष्काळजीपणा झाला नाही. यात कोणाचाच हात नाही, असा निष्कर्ष काढला आहे. जर दोष कुणाचा नाही, तर माझ्या मुलाचा हात कुणामुळे गेला? डॉक्टरांच्या निष्काळजीपणा व टोकाच्या बेफिकिरीमुळे माझ्या मुलाचा हात गेला आहे. तुमचेच डॉक्टर, तुमचीच चौकशी समिती, मग वेगळा काय अहवाल येणार? असा उद्विग्न सवाल त्या चिमुकल्याचे वडील राहुल चव्हाण यांनी केला आहे.

बाळाच्या जन्माला आता ७० दिवस झाले. सध्या ते रुग्णालयात नवजात शिशू अतिदक्षता विभागात कृत्रिम प्राणवायूवर आहे. बाळाची आई अश्विनी दक्षता विभागाच्या बाहेर बसून असते. आपले बाळ कधी चांगले होईल, कधी त्याला घेऊन घरी जाऊ ही एकच चिंता तिला सतावत आहे. १२ ऑगस्ट रोजी, केइएमच्या बेफिकिरीमुळे बाळाचा हात कापावा लागल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले हाेते. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी चार डॉक्टरांची चौकशी समिती नेमली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळाच्या वडिलांना भेटून चौकशी करत पाच लाखांची मदतही देऊ केली. बाळाचे वडील राहुल चव्हाण नालासोपारा येथे रिक्षा ड्रायव्हर. ते ‘लोकमत’शी म्हणाले, ‘बाळाच्या उजव्या हाताला सलाईन देण्यासाठी सुई लावून औषधे दिली जात होती. त्या सुईचा संसर्ग झाला. १५ जुलै रोजी बाळाचा हात निळा पडू लागल्याने बाळाच्या आईने डॉक्टरांना कळविले, मात्र ‘ते होईल बरे’ असे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवसापर्यंत हात आणखी निळा-काळा झाला. त्यांनी दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना पुन्हा सांगितल्यानंतर सलाईनची ती सुई काढली. तोपर्यंत वेळ निघून गेली. आजही बाळाची स्थिती चांगली नाही.

चौकशी समितीचा अहवाल आला आहे. त्यात कुठलाही निष्काळजीपणा झालेला नाही. बाळाची तब्येत सुधारत आहे. बाळाला रक्त गोठण्याचा विकार असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले आहे. त्यावर उपचार सध्या सुरू आहेत.  - डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त (आरोग्य)

टॅग्स :केईएम रुग्णालय