एकनाथ शिंदे गटाचे भवितव्य ठरवणारी राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 06:30 AM2022-08-11T06:30:12+5:302022-08-11T06:30:23+5:30
सरन्यायाधीश रमणा यांच्या अध्यक्षतेखाली या याचिकांवर सुनावणी सुरू आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे भवितव्य ठरवणारी राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा पुढे गेली आहे. ८ ऑगस्ट रोजी होणारी ही सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार होती, मात्र आता ती २२ ऑगस्ट रोजी होणार आहे.
याचिका प्रलंबित असतानाच शिंदे गटाने विधानसभेचे अधिवेशन बोलवून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली. विधानसभेत बहुमतही सिद्ध केले. त्याबाबत मागील सुनावणीवेळी सरन्यायाधीश रमणा यांनी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांना कडक शब्दांत विचारणा केली होती.
सरन्यायाधीश रमणा यांच्या अध्यक्षतेखाली या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. मात्र रमणा २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. २२ ऑगस्ट रोजी रमणा या याचिका घटनापीठाकडे वर्ग करणार की त्यावर निकाल देणार याकडे लक्ष लागले आहे.