मुंबई : गोवंडीतील शाफत अली मोहम्मद हनिफ (२५) या तरुणाच्या ह्रदयावर केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी आठ तास शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवनदान दिले आहे.
केईएमच्या हृदय विभागात रुग्णाच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात टुडी ईको, अँजिओग्राफीचा समावेश होता. त्यावेळेस, रुग्णाच्या हृदयाच्या डाव्या बाजूला फुगा आल्याचे दिसले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्वरित शस्त्रक्रिया न केल्यास पक्षाघाताचा धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या आजाराची स्थिती गंभीर असून, फुगा फुटल्यास मृत्यू होऊ शकतो, असे सांगितले. मंगळवारी सकाळी ११:३० पासून सुरू झालेली ही शस्त्रक्रिया सायंकाळी आठपर्यंत सुरू होती.
या शस्त्रक्रियेत फुग्याचे तोंड म्हणजेच सुरुवातीचा भाग आतील बाजूने बंद केला. या फुग्यामुळे हृदयाला इजा झाली होती. त्यावरही तातडीने उपचार करण्यात आल्याची माहिती हृदयविभागाचे प्रमुख डॉ. बालाजी ऐरोनी यांनी दिली.