उष्णतेच्या लाटांनी राज्य झाले बेजार, 5 दिवसांत अधिक वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 08:33 AM2022-03-28T08:33:26+5:302022-03-28T08:33:50+5:30
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.
मुंबई : उत्तर भारतातील काही राज्ये उष्णतेने होरपळत असतानाच, आता महाराष्ट्रालाही उष्णतेच्या लाटांचा फटका बसत आहे. राज्यातील बहुतांशी शहरांच्या कमाल तापमानाने ३८ अंशावर उसळी घेतली असून, आता तर पुढील पाच दिवस महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. शिवाय पश्चिमी हिमालय क्षेत्र, गुजरातमधील काही भाग, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसेल, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना फटका बसणार...
बुलडाणा, अकोला, जळगाव, हिंगोली, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, यवतमाळ, अमरावती.
२८ मार्च : विदर्भात उष्णतेची लाट येईल.
२९ आणि ३० मार्च : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट येईल.
३१ मार्च : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.