मुंबईत सर्वाधिक मागणी २ बीएचके घरांनाच, गतवर्षी दीड लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 10:34 AM2024-03-05T10:34:37+5:302024-03-05T10:35:38+5:30
यंदाही ट्रेंड कायम.
मुंबई :मुंबईसह महामुंबई परिसरात २०२३ मध्ये दीड लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली. यामध्ये सर्वाधिक ४२ टक्के वाटा दोन बेडरूम हॉल किचन (टू-बीएच-के) या घरांच्या विक्रीचा होता. २०२४ या वर्षाच्या दोन महिन्यांतदेखील हाच ट्रेन्ड कायम असल्याचे दिसून आले आहे.
अलीकडच्या काळात वन रूम हॉल किचन ही संकल्पना आता मागे पडत चालली आहे. लोक मोठ्या घरांना पसंती देत आहेत. विशेषतः लॉकडाउनमध्ये अनेक लोक घरीच होते. त्यामुळे घरातील प्रत्येकाला घरात स्वतःची थोडी तरी हक्काची जागा असावी, हे लोकांच्या लक्षात आले. त्यातूनच दोन रूम हॉल व किचन घरांच्या मागणीने जोर पकडल्याचे विश्लेषण होत आहे.
मुंबई व उपनगरातील बहुतांश विकासकांनीदेखील आता आपल्या गृहनिर्माण प्रकल्पांतून वन रूम हॉल किचन घरांची बांधणी थांबवली आहे किंवा अतिशय कमी केली आहे व टू-बीएच-के घरांच्या निर्मितीवर जोर दिला आहे. त्यानंतर सर्वाधिक किमती या पश्चिम उपगनरांत असल्याचे दिसून येते.
२०२४ चे चित्र कसे आहे ?
१) २०२४ च्या पहिल्या दोन महिन्यांत मुंबई व उपनगरात मिळून एकूण २२ हजार घरांची विक्री झाली. त्यामध्येदेखील सर्वाधिक विक्री ही टू-बीएच-के घरांची झाल्याचे दिसून आले.
२) यावर्षी मुंबईत ४०० पेक्षा जास्त गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामध्येदेखील टू-बीच-के घरांचा वाटा सर्वाधिक असल्याचे समजते.
किमती किती आहेत ?
मुंबई शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे या तिन्ही ठिकाणी विभागनिहाय घरांच्या किमती वेगवेगळ्या आहेत. मुंबई शहरामध्ये ६३० ते ७०० चौरस फुटांचे आकारमान असलेल्या घरांच्या किमती या दीड कोटी व त्यापुढे आहेत. त्यानंतर सर्वाधिक किमती या पश्चिम उपगनरांत असल्याचे दिसून येते.
१) पश्चिम उपनगरात ७५ लाख रुपयांपासून पुढे घरांच्या किमती आहेत. या तुलनेत पूर्व उपनगरातील घरांच्या किमती कमी आहेत.
२) पूर्व उपनगरातील बहुतांश विकास प्रकल्प अद्यापही सुरुवातीच्या किंवा नियोजनाच्या टप्प्यांत आहेत. येथील घरांच्या किमती या ५५ लाख रुपये व त्यापुढे आहेत.
गृहनिर्माण संस्थांच्या खरेदी-विक्री व ट्रेन्डचा अभ्यास करणाऱ्या सर्वेक्षण संस्थांच्या मते, २०२३ मध्ये ज्या लोकांनी टू-बीएच-के घरांची खरेदी केली त्यामध्ये सर्वाधिक वाटा ज्यांची घरे होती त्या घरांची विक्री करून त्यात वाढीव कर्जाची उचल करत घरे घेणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक होती.
गेल्या दीड वर्षात मुंबईत रिअल इस्टेट उद्योगामध्ये तेजीचे वारे वाहत आहेत. विशेषतः ज्या लोकांची घरे मेट्रो किंवा तत्सम विकासकामांच्या जवळ होती, त्यांच्या घरांना उत्तम भाव आला. त्या पैशांत भर घालत मोठ्या घरांची खरेदी केल्याचे विश्लेषण केले जात आहे.