मनोज गडनीस, मुंबई: नुकत्याच संपलेल्या २०२३ च्या वर्षात देशातील विमान प्रवाशांच्या संख्येने आजवरचा सर्वोच्चांक गाठला असून गेल्यावर्षी तब्बल १५ कोटी २० लाख लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी गो-फर्स्ट कंपनी बंद पडली त्यामुळे कंपनीची ५६ विमाने जमिनीवरच स्थिरावली तर त्या पाठोपाठ इंडिगो आणि एअर इंडियाच्या देखील काही विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या दोन्ही कंपन्यांची काही विमाने बंद पडली. एकूण १२५ च्या आसपास विमाने बंड पडल्यामुळे गेल्यावर्षभरात विमान तिकीटांच्या किमती कायमच वाढलेल्या होत्या. तरीही लोकांनी विमान प्रवासाला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, यापूर्वी २०१९ मध्ये अर्थात लॉकडाऊनच्या अगोदर देशातील प्रवासी संख्येने १४ कोटी ४० लाखांचा टप्पा पार करत विक्रम रचला होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये जवळपास सव्वा वर्ष विमान सेवा ठप्प झाली होती. तर त्यानंतर अनेक निर्बंध लादत विमान प्रवास सुरू झाला होता. मात्र, २०२३ च्या वर्षात कोरोनाच्या सावटातून विमान क्षेत्र पूर्णपणे बाहेर आले असून १५ कोटी २० लाख प्रवासी संख्येचा उच्चांक गाठला गेला आहे.