Join us  

पावसाळ्यात होर्डिंग कोसळणार नाही, रेल्वे प्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 12:14 PM

पावसाळ्यात रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग कोसळणार नाहीत, अशी हमी रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. तसे प्रतिज्ञापत्र रेल्वेतर्फे सादर करण्यात आले. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात होर्डिंग सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.

मुंबई - पावसाळ्यात रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग कोसळणार नाहीत, अशी हमी रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. तसे प्रतिज्ञापत्र रेल्वेतर्फे सादर करण्यात आले. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात होर्डिंग सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.

पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल न्यायमूर्ती पी. व्ही. संजय कुमार यांनी केला होता. यावर शुक्रवारी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजीत बॅनर्जी यांनी न्या. संजय कुमार आणि न्या. ए. जी. मसीह यांच्या खंडपीठापुढे बाजू मांडली. रेल्वेमार्गावरील होर्डिंग्जमुळे कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवणार नाही; याची खात्री करण्याची जबाबदारी घेण्यास रेल्वे तयार आहे, असे त्यांनी नमूद केले, तर वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि बलबीर सिंग यांनी मुंबई महापालिकेची बाजू मांडली.

नियमित स्ट्रक्चरल ऑडिटमध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ९९ ठिकाणी एकूण १३८ लोखंडी जाहिरात फलक लावण्यात आली आहेत. या फलकांचा कालावधी ५ वर्षे ते कमाल ७ वर्षांपर्यंत आहे. फलकांचा कमाल आकार १०० बाय ४० चौरस फूट आहे. यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट नियमितपणे केले जाते. अभियांत्रिकी विभागाकडून फलकाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण ११६ ठिकाणी एकूण १३७ लोखंडी जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. फलकांचा कालावधी ५ वर्षे ते कमाल ७ वर्षापर्यंत आहे. फलकाचा कमाल आकार १२२ बाय १२० चौरस फूट आहे. यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट नियमितपणे केले जाते. फलकांच्या स्थिरतेच्या दृष्टिकोनातून स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले आहे.

रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग्जची जबाबदारी रेल्वे घेते. आम्ही एजन्सीकडून होर्डिंग्जचे ऑडिट करून घेतले आहे. हे सगळे स्ट्रक्चर व्यवस्थित आहेत, असा अहवाल सगळ्या एजन्सींनी दिलेला आहे. शिवाय मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूटने रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग्ज व्यवस्थित आहेत आणि ते पडणार नाहीत, असे सांगितले आहे. त्यानुसार, आम्ही न्यायालयात ही माहिती सादर केली आहे. - डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

रेल्वेने आपले काम बघावे आणि महापालिकेने आपले काम बघावे, असे सुनावणीदरम्यान म्हटले आहे. मान्सूनदरम्यान होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना घडणार नाही; याची काळजी घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आम्हीदेखील केवळ मान्सूनच नाही तर सर्वसाधारण काळात अशा दुर्घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेत असतो. सगळे होर्डिंग्ज व्यवस्थित असल्याचे आम्ही न्यायालयाच्या लक्षात आणून दिले आहे. - वरिष्ठ अधिकारी, पश्चिम रेल्वे

टॅग्स :मुंबई