- मनोहर कुंभेजकर
मुंबई - विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटलमधील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम.बी.बी. एस चे विद्यार्थी व विद्यार्थीनिंचे होस्टेल लवकर सुरू होणार आहे.यासंदर्भात आज राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल यांची भेट घेवून त्यांना सदर होस्टेल लवकर सुरू करण्याच्या मागणीचे पत्र दिले. सदर होस्टेल लवकर सुरू करणार असल्याची ग्वाही पालिका आयुक्तांनी आपल्याला दिल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.
अजूनही पालिका प्रशासन होस्टेलची सुविधा उपलब्ध करून देत नसल्याने येथील शिक्षण घेणारे विद्यार्थी व पालक हवालदिल झाले असल्याचे त्यांना सांगितले. येथील एम.बी.बी.एसचे विद्यार्थी अजूनही होस्टेलच्या प्रतिक्षेत आहेत. अंधेरी पश्चिम टाटा कंपाऊंड येथे १० मजली होस्टेलच्या बिल्डिंग मधे विद्यार्थी विद्यार्थीनीसाठी स्वतंत्र इमारत उभी आहे. पण अजूनही येथे कॅाटस् बेडस् इतर आवश्यक फर्निचर , जेवण्याची सोय या व इतर अनेक गोष्टीची कमतरतेमुळे होस्टल सुरू झाले नाही. फायर सिस्टीम इनस्टॉल झालेली दिसते पण फायर ऑडीट झालेले दिसत नाही. त्यामुळे ऑकक्युप्शन सटिॅफिकेट मिळाले नाही.
एम.बी.बी. एसच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी विलेपार्ले व अंधेरी विभागात एका रूम साठी ७० ते ८० हजार रूपये भाडे आकारले जाते, शिवाय जेवणाचे १५००० रू. वेगळे. आमच्या सारख्या ग्रामीण भागातल्या कुटुंबाला परवडणार नाही अश्या अनेक समस्या डॉ.दिपक सावंत यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले. तसेच याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त, पालिका उपायुक्त,कूपर हॉस्पिटलचे डिन यांच्या पातळीवर आपण गेल्या काही महिन्यापासून पाठपुरावा केला,मात्र अजूनही येथील होस्टेल सुरू झाले नाही अशी माहिती त्यांनी आयुक्तांना दिली.
या संदर्भात लोकमतने सातत्याने या प्रश्नाला वाचा फोडली आहे.काल लोकमतच्या ऑनलाईन आणि आजच्या लोकमतमध्ये "होस्टेल उभारले, पण ओसी नाही" विद्यार्थी निवाऱ्याच्या प्रतीक्षेत या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.लोकमतच्या वृत्ताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालिका आयुक्तांनी घेतली अशी माहिती डॉ.दिपक सावंत यांनी दिली.लोकमतने या महत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडल्याने आता येत्या नव्या वर्षात लवकर येथील होस्टेलचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास डॉ.दिपक सावंत यांनी व्यक्त केला.
येत्या आठ दिवसात कॅालेज होस्टलला ऑकक्युप्शन सटिॅफिकेट मिळण्यासाठी व फायर ऑडिट साठी कार्यवाही करा,येथे लिफ्ट लवकर सुरू करण्या साठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्या,बेडस,फर्निचर,मेसची व्यवस्था करण्यासाठी टेंडर काढा असे आदेश आयुक्तांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.