Join us

महारेराने ठरवून दिलेल्या विक्रीकरारानुसार घर विक्रीकरार बंधनकारक 

By सचिन लुंगसे | Published: December 16, 2022 5:50 PM

घर खरेदीदार अणि विकासक ह्यांच्यातील घर विक्रीकरार महारेराने  ठरवून दिलेल्या प्रमाणीकृत ( standardized) मसुद्यानुसार व्हावा असा महारेराचा आग्रह आहे. 

मुंबई :

घर खरेदीदार अणि विकासक ह्यांच्यातील घर विक्रीकरार महारेराने  ठरवून दिलेल्या प्रमाणीकृत ( standardized) मसुद्यानुसार व्हावा असा महारेराचा आग्रह आहे.  परंतु महारेराकडे घर खरेदीदारांच्या ज्या तक्रारी येतात त्यात विहित मसुद्यातील  कलमांच्या ऐवजी वेगळ्या स्वरुपाची कलमे समाविष्ट केल्याचे आढळते. याची नोंद घेऊन महारेराने  घर खरेदीदाराचे हित जपले जावे यासाठी काही बाबी स्पष्ट केल्या आहेत.

यात महारेरा, विक्री करारांमध्ये   दैवी आपत्ती(force majeure),चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी, आणि हस्तांतरण करार या विक्री करारातील 4 अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदींबाबत   कोणतीही तडजोड करणार नाही. या 4 मुद्द्यांबाबतच्या तरतुदी करारात असल्याच पाहिजेत, असा महारेराचा आग्रह आहे. इतर बाबतीत खरेदीदारांच्या सहमतीने बदल केले जाऊ शकतात. परंतु खरेदीदाराला ते बदल ठळकपणे कळण्यासाठी ते अधोरेखित ( बोल्ड) करणे आवश्यक आहे.  जेथे अशा अनिवार्य कलमांचे उल्लंघन होत असेल तेथे महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांच्या नोंदणीचे   अर्ज सरसकट नाकारू शकते. घर खरेदीदारांचे हित जपले जावे यासाठी महारेराने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.  यासंबधीचे परिपत्रक नुकतेच महारेराच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आले आहे. 

महत्वाचे मुद्दे

- विकासक आणि घर खरेदीदार यांच्यातील  विक्रीकरार रेरा कायद्यातील तरतुदींशी सुसंगत असावा.

- विकासकांना नोंदणीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे महारेराच्या संकेतस्थळावर  अपलोड करणे बंधनकारक आहे. तथापि असे दिसून आले आहे की बहुतेक वेळा अपलोड केलेला विक्रीकरार महारेराने ठरवून  दिलेल्या  मसुद्यानुसार असतोच  असे नाही.

- विकासकास प्रत्येक प्रकरणातील  तथ्ये आणि परिस्थितीच्या आधारे  कराराच्या विहीत मसुद्यामध्ये  बदल करण्याची परवानगी  आहे. परंतु रेरा कायद्यातील तरतुदी अनिवार्य आहेत.  विकासक आणि घर खरेदीदार  यांच्यातील  प्रत्येक करारामध्ये  त्या कायम ठेवल्याच पाहिजेत.  विक्रीकरारातील  कोणतेही कलम रेरा कायद्याच्या कोणत्याही तरतुदींशी विसंगत असल्याचे आढळल्यास, ते रद्द केले जाईल.

- विकासकांनी विक्रीसाठीच्या विहीत करारात बदल केला असल्यास तो अधोरेखित करणे आवश्यक आहे. जेणेकरुन  खरेदीदारांंना  विक्रीकरार सहज समजू शकेल.

- रेरा कायद्यातील तरतुदीनुसार  नैसर्गिक आपत्तीचा(Force Majeure) उल्लेख आवश्यक. 

- रेरा कायद्यातील तरतुदीनुसार चटई क्षेत्राचा स्पष्ट उल्लेख करारात अत्यावश्यक आहे.

- विकासकाने प्रकल्प हस्तांतरणानंतर असोसिएशन किंवा सोसायटी किंवा सहकारी संस्था तयार करण्यासाठी रेरा कायद्यातील तरतुदीनुसार मदत करावी.

- दोष दायित्व कालावधी हा  रेरा कायद्याच्या तरतुदीनुसारच असणे बंधनकारक आहे.

- महारेरा कायद्याच्या  तरतुदींच्या  विरोधात  या मुद्द्यातील कलमांना खरेदीदाराने सहमती दिली असली तरीही ती सुरवाती पासूनच रद्द मानली जाईल आणि खरेदीदारांना बंधनकारक राहणार नाही. घर खरेदीदारांनी सुध्दा असा करार करताना तो महारेराने ठरवून दिलेल्या मसुद्याप्रमाणेच राहील, याची खात्री करुन घ्यायला हवी.

- जेथे अशा अनिवार्य कलमांचे उल्लंघन होत असेल तेथे महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांच्या  नोंदणीचे  अर्ज सरसकट नाकारु शकते, हे पुन्हा स्पष्ट करण्यात येत आहे.