- जयंत होवाळमुंबई - कोळीवाडा गावठाणातील वहिवाटेतील घरांना मार्गदर्शक तत्वाअंतर्गत नियमित करण्यात येणार आहे.पण त्याकरिता संबंध गावठाण येथील नियमावलीतील विनिमय व विकास नियंत्रण नियमावली च्या कायद्याअंतर्गत नियमित करण्याचे ठरेल,असा निर्णय झाला आहे. मुंबईतील कोळीवाडा गावठाणच्या सिमांकनाच्या प्रलंबित विषया संदर्भात मुख्यमंत्र्यांचे अप्पर प्रधान सचिव भूषण गगरानी यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने गुरुवारी बैठक पार पडली.
बैठकीत मुंबई शहर व उपनगरामध्ये कोळीवाड्यांच्यासाठी गावठाण व विस्तारित गावठाण यांच्या सिमांकनाचा मुद्दा घेण्यात आला. कोळीवाडा गावठाण व विस्तारित कोळीवाडा गावठाण यांचे कमाल चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करण्याचा शासन निर्णय प्रस्तावित करण्याचा व विकास आराखड्यात तत्संबंधी बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोळीवाडा गावठाण व त्यातील विस्तारित क्षेत्र याचे अंतिम सर्वेक्षण महसूल विभागाच्या अंतिम मंजुरी साठी पाठविण्याचे ठरले. यामुळे सर्व कोळीवाडे, गावठाण व आदिवासी पाडे संरक्षित होतील, अशी मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात येतील. त्याची प्रत झोपडपट्टी प्राधिकरण, जिल्हाधिकारी शहर व उपनगर तसेच महानगर पालिकेला सादर करावी असेही ठरले. बैठकीस कोळीवाडा गावठाण समितीच्या नियुक्त सदस्य उज्ज्वला पाटील, पंकज जोशी, वेदांत काटकर, राजेश मांगेला, गिरीश साळगांवकर उपस्थित होते.