श्रीकांत जाधव -
विविध प्रलंबित मागण्यासाठी आझाद मैदानात आमरण उपोषणास बसलेल्या मातंग समाजाने बुधवारी आनंद साजरा करीत आपले उपोषण तात्पुरते स्थगित करीत असल्याची घोषणा केली.
मुंबई मराठी पत्रकार संघात मातंग क्रांती महामोर्चा राज्य कोअर कमिटीचे मोहन राव, राजेंद्र साठे, सुनिता तुपसौंदर, शामराव सकट यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांना ही माहिती दिली. मातंगांची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन झाली पाहिजे, मातंग समाजाला ८ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे या मागण्यासाठी आझाद मैदानात १८ जानेवारीपासून आमरण उपोषण केल्यामुळे सरकारने या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्यामुळे आंदोलन तात्पुरते मागे घेतले असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
सरकारने जर या मागण्यांबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन पुन्हा करण्यात येणार असल्याचे ही मातंग क्रांती महामोर्चाने स्पष्ट केले.