काशीमीरा भागातील बेकायदा बांधकाम करणारे माफिया अखेर गजाआड, गंभीर गुन्ह्यात नाव
By धीरज परब | Published: August 30, 2022 09:13 PM2022-08-30T21:13:59+5:302022-08-30T21:14:24+5:30
पालिकेच्या कारवाईसाठी आलेल्या पथकावर हल्ला करण्यासह , बनावट दस्त तयार करणे आदी विविध प्रकारचे तब्बल ११ गुन्हे चौहान वर दाखल आहेत.
मीरारोड - काशीमीरा भागात खोटे दस्त , फसवणूक सह अनधिकृत बांधकामे करून लोकांना विकणाऱ्या मनोज चौहान सह बाबू कालिया ह्या दोघा सराईतांना काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे. काशीमीरा भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे करून लोकांना विकून त्यांची फसवणूक करण्यात मनोज चौहान (३९) हा आघाडीवर आहे.
पालिकेच्या कारवाईसाठी आलेल्या पथकावर हल्ला करण्यासह , बनावट दस्त तयार करणे आदी विविध प्रकारचे तब्बल ११ गुन्हे चौहान वर दाखल आहेत . त्याच्या तडीपार करण्याचा प्रस्ताव देखील वरिष्ठ अधिकारी स्तरावर प्रलंबित आहे . तर गुलाम गौस अब्दुल हमीद शेख उर्फ बाबू कालिया (४२) हा देखील बेकायदा बांधकामे , फसवणूक आदी अनेक गुन्ह्यात आरोपी असून त्याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत .
डिसेम्बर २०२० सालच्या एका गुन्ह्यात चौहान व कालिया हे दोघे पाहिजेत आरोपी होते . चौहान ह्याला २६ ऑगस्ट रोजी त्यात ठाणे न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला . तर जानेवारी २०२२ मध्ये दाखल बनावट दस्त च्या गुन्ह्यात चौहान हा पाहिजे आरोपी होता . वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भाऊसाहेब डुबे यांना चौहान व कालिया याची माहिती मिळाल्या नंतर दोघांनाही अटक करण्यात आली.
गेल्या अनेक महिन्यां पासून पोलीस त्यांच्या शोधात होते असे पोलीस सूत्रांनी सांगितले . अटक आरोपीना ठाणे न्यायालयात हजर केले असता त्यांना २ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती उपनिरीक्षक डुबे यांनी दिली . आरोपी हे सराईत असून त्यांची चौकशी सुरु आहे . त्यांच्यावर तडीपारी सह अन्य प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित असल्याचे वरिष्ठ निरीक्षक हजारे म्हणाले .