मुंबई : कोरोनाच्या काळात गेल्या दोन वर्षांत मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. स्थानिक वातावरणातील घटक, पावसाळा, लोकसंख्येची घनता आणि अन्य कारणांमुळे हे प्रमाण वाढल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. २०१९ - २०मध्ये राज्यात मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण ९,४९१ होते, तर २०२१-२२ रुग्णांच्या ही संख्या १७,३६५ इतकी झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मलेरिया मुक्तीत अडथळा आणण्यासाठी भौगोलिक रचनेसह स्थानिक घटक कारणीभूत आहेत. मुंबई पालिकेच्या माहितीनुसार, २०१०च्या मलेरिया प्रसारानंतर शहरातील प्रादुर्भावाच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, शहर उपनगरात वर्षाला पाच हजार रुग्णांची नोंद होते. मुंबई महापालिकेने डास निर्मूलन समिती स्थापन केली असून, त्यानुसार मलेरियावर नियंत्रण मिळण्यासाठी स्थानिकांकडून खबरदारी घेतली जाते का, याची पाहणी केली जाते.