ताई, हाफ तिकिटाच्या नादात पर्समधील सोने होईल साफ; बस थांब्यावरून दोन तोळ्यांचे मंगळसूत्र चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 12:18 PM2023-04-01T12:18:12+5:302023-04-01T12:18:55+5:30
यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत एकूण ६,१७५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३,४४६ गुन्ह्यांची उकल झाली.
मुंबई : बसमध्ये अनेकदा महिला लहान मुलांच्या हाफ तिकिटासाठी कंडक्टर सोबत वाद घालताना दिसतात. मात्र, याच हाफ तिकिटाच्या नादात किमती सामान चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी, प्रवाशांनी त्यांच्याकडील किमती सामानाची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत एकूण ६,१७५ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३,४४६ गुन्ह्यांची उकल झाली. यामध्ये घरफोडीचे २२५ गुन्हे नोंद झाले आहे. रात्रीच्या वेळी सर्वाधिक १८७ घरफोड्यांच्या घटनांचा यामध्ये समावेश आहे. गेल्यावर्षी याच दोन महिन्यांत घरफोडीच्या २४२, तर चोरीच्या ६४२ घटनांची नोंद झाली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत चोरीच्या घटनात वाढ आहे. त्यामध्येही बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच बाजार, पर्यटन स्थळे येथे चोऱ्या होत आहेत.
बस थांब्यावरून दोन तोळ्यांचे मंगळसूत्र चोरी
गोरेगाव येथील पाटकर कॉलेजसमोरील बस थांब्यावर बसून बसची वाट बघत बसलेल्या ३० वर्षीय गृहिणीचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून चोरट्याने पळ काढला. गोरेगाव पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या दुकली विरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी घटनास्थळवरील सीसीटीव्ही ताब्यात घेत त्यानुसार, आरोपीचा शोध घेत आहे. या घटनेने बस थांब्यावर एकच गोंधळ उडाला होता.
बसस्थानक, बसमध्ये चढताना, उतरताना काय काळजी घ्याल?
बसच्या गर्दीचा फायदा घेत चोरटे किमती ऐवजावर हात साफ करण्याच्या घटना वेळोवेळी समोर येतात. अशा वेळी नागरिकांनी बसमध्ये चढताना उतरताना तसेच गर्दीत आपल्याकडील किमती सामानाची काळजी घेणे गरजेचे आहे.
विद्यार्थिनीचा मोबाइल पळवला
परीक्षेला जाण्यासाठी बसची वाट बघत असलेल्या विद्यार्थिनीचा मोबाइल हिसकावून चोरट्याने पळ काढल्याची घटना अंधेरीत घडली. या प्रकरणीय गुरुवारी तारखेला आंबोली पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.