मुंबई : मूनलायटिंग अर्थात एकाचवेळी दोन ठिकाणी नोकरी करणे. एका ठिकाणी नोकरी करताना आपला छंद जोपासत त्या मार्गाने पैसे कमाविणाऱ्या मात्र त्या उत्पन्नाची माहिती दडविणाऱ्या लोकांना आता आयकर विभागाने त्याच्या परिणामांची तयारी ठेवा, असा थेट इशाराच दिला आहे. मूनलायटिंग करणाऱ्या लोकांनी दुसऱ्या स्राेताद्वारे मिळणारे उत्पन्न आपल्या वार्षिक आयकर विवरणामध्ये दाखविले नाही आणि त्यावर आनुषंगिक कर भरला नाही तर कारवाई करण्याचा थेट इशारा विभागाने दिला आहे.
कोरोना लॉकडाऊन काळात वर्क फ्रॉम होम करताना अनेकांनी दुसरी नोकरी अथवा दुसऱ्या मार्गानेदेखील पैसे मिळविण्यास सुरुवात केली. जगात या प्रकाराला मूनलायटिंग असे संबोधण्यास सुरुवात झाली. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात अनेकांनी दुहेरी उत्पन्न मिळवूनही केवळ मुख्य नोकरीद्वारे मिळणारे उत्पन्नच आपल्या वार्षिक आर्थिक विवरणामध्ये दाखविले व त्यावर आनुषंगिक कर भरणा केला.
उत्पन्न लपविल्यास कारवाई
दुसऱ्या मार्गाने मिळालेल्या उत्पन्नाची कोणताही माहिती आपल्या वार्षिक आर्थिक विवरणात नमूद केले नाही आणि त्यावरील कर भरणादेखील केला नाही. या पार्श्वभूमीवर मूनलायटिंग करणाऱ्या लोकांनी चालू आर्थिक वर्षाकरिता दाखल करण्यात येणाऱ्या विवरणामध्ये दुसऱ्या मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचादेखील उल्लेख करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
कोणाला भरावा लागेल कर?
मूनलायटिंग करणाऱ्या व्यक्तीने जर अन्य कंपनीकडून ३० हजार रुपयांपेक्षा जास्त व्यावसायिक वन टाईम शुल्क स्वीकारले, तर ते शुल्क देणाऱ्या कंपनीला त्या पैशांमधून टीडीएस कापणे बंधनकारक असेल.एका आर्थिक वर्षात एक लाख रुपये अथवा त्यापेक्षा जास्त पैसे मिळाले तर त्या पैशांवरदेखील ते पैसे देणाऱ्या कंपनीला टीडीएस कापणे बंधनकारक असेल करपात्र रकमेवरील पैशांतून टीडीएस कापला गेला नसेल आणि त्या व्यक्तीनेदेखील त्याची माहिती वार्षिक आर्थिक विवरणामध्ये नमूद केली नाही तर, ती करचोरी समजली जाईल. संबंधित व्यक्तीवर आयकर विभागाच्या करचोरीविषयक नियमांच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल.