लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलिटर, तर राज्याचा कर २९ रुपये आहे. आता उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले सांगा, राज्यात पेट्रोल, डिझेलची महागाई कोणामुळे आहे, असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इंधन दरवाढ आणि ओबीसी आरक्षण या दोन्ही मुद्दयांवर राज्य सरकारविरुद्ध एल्गार पुकारण्याचे आवाहन पक्ष कार्यकर्त्यांना केले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक येथे झाली. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी जी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन व आशिष शेलार तसेच प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय व्यासपीठावर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, राज्यात पेट्रोलवर केंद्राच्या करापेक्षा राज्याचा कर दहा रुपये जास्त असताना महागाई कोणामुळे आहे, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले पाहिजे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी याच्या विरोधात आंदोलन करून आघाडी सरकारचा खोटारडेपणा उघड करावा. ओबीसींचे राजकीय आरक्षण परत कसे मिळवायचे, याचा उपाय आपण मध्य प्रदेश सरकारला सांगितला. त्यानुसार त्यांनी डेटा गोळा करून कारवाई केली व त्यांना हे आरक्षण परत मिळाले. आपण हाच उपाय अनेकदा महाविकास आघाडी सरकारला सांगितला पण त्यांनी त्यानुसार कारवाई केली नाही व त्याचाच फटका बसला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने समाजाच्या सर्व घटकांशी भाजप कार्यकर्त्यांनी संवाद साधावा. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील-दानवे, भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व भाजप प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या आणि सर्व जिल्हा पदाधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.