असंसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण हे अतिशय चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2023 11:28 AM2023-06-23T11:28:17+5:302023-06-23T11:28:44+5:30
परदेशामध्ये ज्या प्रमाणात योगोपचाराचा वापर केला जात आहे, त्या प्रमाणात आपल्या देशात प्रसार होणे गरजेचे आहे.
मुंबई : मानवी जीवनात असंसर्गजन्य आजारांचे वाढत असलेले प्रमाण चिंताजनक आहे. या आजारांवर नियंत्रणासाठी योगासारख्या अखर्चिक व किमान साधनांची आवश्यकता असलेल्या प्रतिबंधात्मक उपचारांचा वापर होणे आवश्यक आहे. मेडिटेशन, योग यासारख्या थेरपींमध्ये सातत्य व नियमितपणा ठेवला, तर अनेक आजारांपासून दूर राहणे शक्य आहे. परदेशामध्ये ज्या प्रमाणात योगोपचाराचा वापर केला जात आहे, त्या प्रमाणात आपल्या देशात प्रसार होणे गरजेचे आहे.
शारीरिक आजारांव्यतिरिक्त क्रोध, मानसिक व्याधींवर नियंत्रण मिळवण्याचे सामर्थ्य योगामध्ये असल्यामुळे सर्वांनी आपल्या दिनचर्येतील काही वेळ योगासाठी व्यतीत करावा, असे मत आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी व्यक्त केले.
आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सेवा आयुक्तालयात जागतिक योग दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांच्या हस्ते झाले. वित्त संचालक जयगोपाल मेनन, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड आदींसह आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते ‘सचित्र योगक्रम’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सहायक संचालक डॉ. सुभाष घोलप यांनी प्रास्ताविकात जागतिक योग दिनाची पार्श्वभूमी व महत्त्व विशद केले. उद्घाटन समारंभानंतर ‘ताण तणावापासून मुक्तीसाठी योग’ या विषयावर कैवल्यधामचे सहायक प्राध्यापक डॉ. सतीश पाठक, ‘असांसर्गिक रोगांमधील योगाचे महत्त्व’या विषयावर कैवल्यधामचे प्राध्यापक डॉ. शरदचंद्र भालेकर आणि ‘अष्टांग योग-समज/ गैरसमज’ या विषयावर सायन येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. गोरक्षनाथ आव्हाड यांची व्याख्याने झाली. तसेच डॉ. साक्षी हडप व डॉ. निकेश अंधारे यांनी उपस्थितांकडून योगाची प्रात्यक्षिक करवून घेतली.