उद्योगमंत्रीच म्हणाले होते टाटा एअरबस प्रकल्प नागपुरात येणार, पण गुजरातलाच गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 09:04 AM2022-10-28T09:04:16+5:302022-10-28T09:04:56+5:30

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती.

The Industries Minister Uday Samant had said that the Tata Airbus project would come to Nagpur, but it went to Gujarat | उद्योगमंत्रीच म्हणाले होते टाटा एअरबस प्रकल्प नागपुरात येणार, पण गुजरातलाच गेला

उद्योगमंत्रीच म्हणाले होते टाटा एअरबस प्रकल्प नागपुरात येणार, पण गुजरातलाच गेला

googlenewsNext

मुंबई -  वेदांता- फॉक्सकॉनपाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. त्यासाठी, पाठपुरावा सुरू असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच यापूर्वी म्हटलं होतं. मात्र, आता हाही प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र, आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी त्याचे भूमिपूजन करणार आहेत. ''टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरातील मिहान येथे होत आहे. त्यासाठी, आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. टाटा कोलॅबरेशनसह हा प्रकल्प येत आहे, त्यामुळे टाटा एव्हीएशनच्या लोकांसाठी आम्हाला बोलावं लागणार आहे,'' असे विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं होतं. १५ सप्टेंबर रोजी उदय सामंत यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात हा विश्वास व्यक्त केला होता. 

या घोषणेमुळे महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भ विकासाच्या स्वप्नांना धक्का बसला आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी गुरुवारी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, वायुसेनेसाठी सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनविण्याची जबाबदारी टाटा एअरबसला सोपविली आहे. कंपनी बडोदा येथील प्लांटमध्ये याची निर्मिती करेल.

महाविकास आघाडीने काहीच केले नाही - फडणवीस

टाटा एअरबसचा प्रकल्प मिहानमध्ये उभारण्याच्या प्रस्तावाला हिरवा झेंडा मिळाला नव्हता. मात्र, आपण त्यासाठी बरेच प्रयत्न केले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

गडकरी यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षांना लिहिले होते पत्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना याच महिन्यात पत्र लिहिले होते. हा प्रकल्प नागपूर परिसरातील टाटा समूहाच्या विस्तारित योजनांसाठी उपयोगी ठरेल, असेही पत्रात नमूद केले होते. गडकरींनी टाटा समूहाशी असलेल्या संबंधांचा हवाला देत मिहानला टाटा समूहाचा विकास हब बनविण्याची विनंतीही केली होती.

बडोद्यात साकारणाया प्रकल्पाची वैशिष्ट्ये

- बडोद्यातील प्लांटमध्ये पूर्णपणे स्वदेशी एअरक्राफ्ट तयार होईल. विमानांचा पुरवठा २०२६ ते २०३१ पर्यंत केला जाईल.
- पहिली १६ विमाने २०२३ ते २०२५ दरम्यान येतील. २०२१ च्या सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस डिफेन्स अॅण्ड स्पेससोबत सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या करारावर सही केली.
- एअरबस चार वर्षांत स्पेनमध्ये
अंतिम असेंब्ली लाइनपासून पलाय अवे स्थितीत पहिली १६ विमाने देईल.
- त्यानंतर ४० विमाने भारतात टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स (टीएएसएल) द्वारा निर्मित व असेंबल केले जातील.
 

Web Title: The Industries Minister Uday Samant had said that the Tata Airbus project would come to Nagpur, but it went to Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.