मुंबई : युतीत किंवा आघाडीत सर्वांच्या मनाप्रमाणे निर्णय होत नाहीत. आम्ही यापूर्वी शिवसेना-भाजप युतीत होतो. तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नव्हते. आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आताही तशा गोष्टी होतात. आघाडी धर्म टिकवण्यासाठी प्रत्येकाने सगळे काही आपल्याच मनाप्रमाणे व्हावे हा हट्ट सोडला पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना सुनावले आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या प्रस्तावावर मनासारखी चर्चाच झाली नाही, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, काँग्रेसने अनेक जागांवरचा हट्ट सोडला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही बऱ्याच जागांवरचा हट्ट सोडला आहे. शिवसेनेने आपल्या अनेक महत्त्वाच्या जागा आघाडीत सोडल्या आहेत. कारण महाराष्ट्रात आम्हाला वेगळे चित्र निर्माण करायचे आहे.