मुंबई: लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रा. हरी नरके यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यही राहिले आहेत.
हरी नरके यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्राच्या विचार व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी हरी नरके यांनी आपली अशी ओळख निर्माण केली, असं एकनाथ शिंदे ट्विटद्वारे म्हणाले.
महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन याचा त्यांचा व्यासंग होता. यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास - संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे, असे नमूद करून एकनाथ शिंदेंनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही वाहिली श्रद्धांजली-
ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने महात्मा फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा अभ्यासक गमावला आहे. प्रा. हरी नरके यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून नेहमी महात्मा फुले यांचे विचार मांडले. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. संशोधक म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हरी रामचंद्र नरके हे एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर होते. सोशल मीडियावरही ते सातत्याने लिखाण करत. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांचा मोठा फॅन फॉलोविंग होता. विशेष म्हणजे २० तासांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एका मुलाखतीसंदर्भातील पोस्ट केली आहे. त्यामुळे, त्यांच्या अकाली निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे, हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. महात्मा फुले- शोधाच्या नव्या वाटा हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याशिवाय महात्मा फुले यांचे मूळ छायाचित्र शोधून प्रसिद्ध करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. प्रमिती ही त्यांची मूलगी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.