रवींद्र वायकर यांच्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू, महापालिका अधिकारीही रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 09:04 AM2023-04-18T09:04:14+5:302023-04-18T09:04:25+5:30
Ravindra waikar: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर असलेल्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत आहे. यामध्ये, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर असलेल्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत आहे. यामध्ये, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. याच प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू करत, पालिकेच्या उद्यान आणि इमारत विभागातील काही अधिकाऱ्यांनाही कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानुसार, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी पालिकेच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडलगत उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यास मंजुरी मिळवली. वायकर यांनी या जमिनीवर मातोश्री क्लब उभारला. याच जागेतील क्रीडांगण व उद्यानासाठी आरक्षित दोन लाख चौरस फूट जागा ताब्यात घेऊन येथे मातोश्री नावानेच पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत आहे. हॉटेल उभारताना वायकर यांनी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.