रेश्मा शिवडेकर,मुंबई : उत्तर मुंबईतीलदहिसर येथे विमानतळ प्राधिकरणाच्या रडारच्या आसपासच्या परिसरात वसलेल्या इमारतींतील हजारो रहिवाशांच्या पुनर्विकासाचा गेली काही वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. सुमारे २५० ते ३०० इमारतींचा हा प्रश्न असून, त्यांचा पुनर्विकास थांबला आहे.
हवाई वाहतूक विभागाचे एक रडार दहिसर पूर्व भागात फार पूर्वीपासून आहे. २०२० मध्ये रडार कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे दहिसर पूर्वेकडील आनंदनगर, छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स इत्यादी परिसरातील इमारतींचा पुनर्विकास बाधित झाला आहे. येथील बहुतांश इमारती १९८४ ते १९९० च्या काळातील आहेत. परंतु, रडारमुळे या इमारतींची उंची वाढविण्याला मर्यादा येत आहेत.
अडचण काय?
१) रडारच्या आसपासच्या इमारतींना पुनर्विकासासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. अनेक बिल्डरांनी आपले प्रकल्प मंजूर करून घेतले.
२) उंचीवर मर्यादा आल्याने बांधकाम ठप्प आहे. उंचीवरील मर्यादा उठेल या आशेवर बिल्डर आहेत. त्यामुळे अनेक पुनर्विकास प्रकल्प अर्धवट स्थितीत आहेत. तेथील रहिवाशांना बिल्डरांनी भाडे देणेही बंद केले आहे.
३) कमी उंचीच्या इमारती बांधणे बिल्डरला परवडत नाही. त्यामुळे रडारच्या आजूबाजूच्या परिसरात वसलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडला आहे.- विनोद घोसाळकर, शिवसेना नेते
४) इमारतींचे बांधकाम ४० वर्षे जुने आहे. जीर्ण झाल्यामुळे दर तीन वर्षांनी इमारतींची दुरुस्ती करावी लागते. तो खर्च परवडत नाही - नितीन सावंत, सचिव, राष्ट्रीय मजदूर आनंद नगर को-ऑप. हाउसिंग सोसायटीज् असोसिएशन लिमिटेड
५) रहिवाशांनी सातत्याने केलेल्या तक्रारींमुळे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने तज्ज्ञांची समिती नेमली. हे रडार गोराई येथे हलविण्याची सूचना करण्यात आली. परंतु, त्यावर अजूनही निर्णय न झाल्याने हा प्रश्न तसाच आहे.
६) उत्तर मुंबईसाठी भाजपने घोषित केलेले उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अलीकडेच घेतलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शेट्टी यांनी या विषयावरून खंतही व्यक्त केली. निवडणुकीनंतर गोयल यांनी या प्रश्नाचा तातडीने पाठपुरावा करून दिलासा द्यावा, असे शेट्टी म्हणाले.