मुंबई - मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन व सभांच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकत आहे. दुसरीकडे ओबीसी समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवत आहे. त्यामुळे, मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कसा सोडवावा हा प्रश्न सरकारपुढे आहे. त्यातच, आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रेचं आयोजन केलं असून धनगर समाज बांधवांनी या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाची एसटी अंमलबजावणी व्हावी यासाठी धनगर जागर यात्रेची सुरुवात १२ ऑक्टोबरपासून होत आहे. मराठवाड्यातील येलडा येथून ही सुरुवात होत असून येलडा, कळंब, जालना जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात ही सभा होत आहे. १२ ते १७ ऑक्टोबर दरम्यान २० ते २२ सभांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये, विदर्भ, मराठवाडा, खान्देश, प. महाराष्ट्र आणि कोकणात ह्या सभा होणार आहेत.
सरकारकडून आश्वासन मिळालं आहे, पण अंमलबजावणीची आवश्यकता आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे आश्वासनावर थांबून जमत नाही. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. पण, आता, अंमलबजावणी व्हायला हवी, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. दरम्यान, २२ तारखेला दसरा मेळावा होत असून कवठे महंकाळ येथील बिरोबावाडीत हा दसरा मेळावा होणार आहे. त्यासाठीही मोठ्या संख्येने लोकं येतील, असे पडळकर यांनी सांगितले.
म्हणून आरक्षणासाठी यात्रा
सरकारमध्ये असलो तर माझ्यासाठी आरक्षणाची चळवळ महत्त्वाची आहे. सरकारमधील माझी कामं मी करत आहे. पण, आरक्षणाच्या लढ्यासाठी लोकांमध्ये राहणे ही माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे. म्हणून, आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माझी यात्रा सुरूच राहिल. महिना दोन महिन्यात याबाबत सरकारने तोडगा काढवा, हे आम्हाला अपेक्षित आहे, असे पडळकर यांनी म्हटले.