Join us

राज्यात दूध भेसळीचा प्रश्न गंभीर, लहानग्यांच्या जीवाशी खेळ; अजित पवार आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 11:20 AM

राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. दूध भेसळ करुन लहानग्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला.

मुंबई - राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे साम्राज्य पसरले आहे. दूध भेसळीचा प्रश्न गंभीर असून लहानग्या कच्च्या-बच्च्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. दूध भेसळ करुन सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. 

विधानसभेत अजित पवार म्हणाले की, दुधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त दूध उत्पादनाच्या काळात सहकारी संस्थांना पावडर करुन एक्सपोर्ट करण्याची परवानगी द्यावी. राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या काही काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे. मात्र दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचे मोठे साम्राज्य पसरले आहे असा आरोप त्यांनी सभागृहात केला. 

तसेच राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. दूध भेसळ करुन लहानग्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. दूध भेसळीमुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. आघाडी सरकारच्या काळात दूध भेसळ करताना सापडल्यास त्याला फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा कायदा प्रस्तावित होता. मात्र राष्ट्रपती या कायद्याला परवानगी दिली नाही, त्यामुळे हा कायदा झाला नाही. मात्र दूध भेसळ ही अत्यंत गंभीर समस्या असून दूध भेसळ करणाऱ्याला फाशीची तरतूद करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.  

टॅग्स :अजित पवार