लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रुग्णालयात निवासी डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी निवासी डॉक्टरांची मार्ड ही संघटना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही कायम असल्याची खंत निवासी डॉक्टर संघटनेत काम केलेल्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. राज्यात महापालिका आणि शासनाची मिळून अशी ३० पेक्षा अधिक वैद्यकीय महाविद्यालये आहेत. तेथे निवासी डॉक्टरांवर अन्याय झाल्यास त्याविरोधात आवाज उठवणारी निवासी डॉक्टर संघटना कार्यरत आहे. गेल्या २० वर्षांत जवळजवळ प्रत्येक वर्षी निवासी डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला आहे.
निवासी डॉक्टरांच्या मागण्यांचे स्वरूप गेल्या अनेक वर्षांपासून तेच असल्याची माहिती वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. निवासी डॉक्टरांना रुग्णालयाच्या परिसरात पुरेसे संरक्षण द्या, विद्यावेतन वेळेवर द्या, नियमित रजा द्या, वसतिगृहे बांधून त्यांच्या राहण्यासाठी चांगली व्यवस्था करा, डॉक्टरांवर रुग्णालय परिसरात हल्ले होणार नाहीत, याची काळजी घ्या. मनमानी करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करा, गाइड द्या... यांसह अनेक मागण्यांसाठी निवासी डॉक्टर दरवर्षी संप करतात. यापूर्वी हा संप दोन दिवस, तर काहीवेळा अनेक दिवस चालला होता, असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
संपकरी डॉक्टर संघटनेबरोबर अनेकवेळा आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी बैठक घेतात, चर्चा करतात. एखादी मागणी मान्य करून अन्य मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, निवासी डॉक्टरांच्या मागण्या एकाचवेळी पूर्ण केल्या जात नाहीत, अशी खंत एका प्राध्यापकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केली.
मी २०१२ ते २०१४ या काळात नायर रुग्णालयात श्वसन विकार विभागात असताना, मार्डचा जनरल सेक्रेटरी होतो. त्यावेळी ज्या मागण्या आम्ही करीत होतो, त्याच आजही कायम आहेत. आमच्यावेळी निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहातून चोरी होणे, एमडीआर-टीबीने निवासी डॉक्टरांचा मृत्यू, गाइड न मिळाल्याने डॉक्टरची आत्महत्या, हल्ले आदी घटना घडल्या होत्या. निवासाची व्यवस्था तेव्हाही चांगली नव्हती. आजही या प्रश्नावर डॉक्टर संप करीत आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे. - डॉ. स्वप्नील कुलकर्णी, श्वसनविकार तज्ज्ञ
मी राज्यातील सेंट्रल मार्डचा सरचिटणीस म्हणून २००४ ते २००६, अशी दोन वर्षे कार्यरत होतो. त्यावेळी निवासी डॉक्टरांवर लागोपाठ हल्ले झाले होते. त्यावेळी आम्ही २८ दिवसांचा संप केला होता. त्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली. आता पदव्युत्तरच्या जागा वाढल्या आहेत, निवासाचा प्रश्न आजही आहे. - डॉ. योगानंद पाटील, पॅथॉलॉजिस्ट