एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी; संक्रांतीआधी ३०० कोटींचा निधी वितरित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 06:14 AM2023-01-14T06:14:39+5:302023-01-14T06:14:51+5:30

शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून एसटी कामगारांची पीएफ, ग्रॅच्युइटी, बँक कर्ज व इतर मिळून ९७८ कोटी रुपयांची रक्कम थकली आहे.

The issue of salary of ST employees is over; 300 crore fund distributed before Sankranti | एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी; संक्रांतीआधी ३०० कोटींचा निधी वितरित

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी; संक्रांतीआधी ३०० कोटींचा निधी वितरित

Next

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा थकलेला पगार देण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी ३०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. मात्र, या निधीतून एसटी कर्मचाऱ्यांना फक्त वेतनच मिळणार असून, पीएफ, ग्रॅच्युइटी, बँक कर्ज आणि इतर देणी कर्मचाऱ्यांना मिळणार नाहीत.

शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून एसटी कामगारांची पीएफ, ग्रॅच्युइटी, बँक कर्ज व इतर मिळून ९७८ कोटी रुपयांची रक्कम थकली आहे. या महिन्याच्या २ तारखेला ९५० कोटी वेतनासाठी मिळावेत, असा प्रस्ताव एसटी महामंडळाने अर्थ खात्याकडे 
पाठवला होता. त्यावर अर्थ खात्यातील अधिकारी निर्णय घ्यायला तयार नव्हते. कर्मचाऱ्यांचा असंतोष पाहून शुक्रवारी त्यावर निर्णय घेण्यात आला. पण, ९५० कोटीपैकी फक्त ३०० कोटी सरकारकडून मिळाले आहेत. अपुऱ्या निधीमुळे बँक, पीएफ, ग्रॅच्युइटी व इतर देणी प्रलंबित राहणार आहेत. मागील महिन्यात वेतनासाठी सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी दिला होता.

जगणे उधारीवर :

वेळेवर पगार होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांचीही मोठी कोंडी होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पगार कधी मिळणार याची शाश्वती नसल्याने कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांची अवस्था केविलवाणी झाली आहे. 

एसटी संपाच्या काळात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. यावेळी सरकारने एकतर उशिरा निधी दिला, त्यात केवळ ३०० कोटी रुपयेच देऊन वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार केला आहे.
 - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस

Web Title: The issue of salary of ST employees is over; 300 crore fund distributed before Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.