मुंबई - मुंबईतील गणेशोत्सवाचे परदेशातील नागरिकांना विशेष आकर्षण असते. याच बाप्पाच्या विविध रूपांसह, आकर्षक देखावे पाहण्यासाठी पायीच बाहेर पडलेले भारतातील जपानचे वाणिज्य दूतावास कनेको तोशिहिरो यांच्या पत्नीची पर्स चोरटयांनी पळवल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी फोर्ट परिसरात घडला. एमआरए मार्ग पोलिसांनी अवघ्या काही तासांतच सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेत चोरट्याला बुधवारी अटक केली आहे.
कम्बाला हिल परिसरात तोशिहिरो दाम्पत्य राहतात. तोशिहिरो यांची पत्नी सयुरी (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. ताज वेलिंगटन हॉटेलमध्ये जेवण उरकून मंगळवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास गणपती पाहण्यासाठी ते पत्नीसोबत बाहेर पडले. पायी चालत फोर्ट परिसरात येत असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्याकडील पर्स चोरी करून पसार झाला. त्यांनी, आवाज दिला मात्र तोपर्यंत चोर पसार झाला होता. त्यांच्या पर्समध्ये ११ हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह सीसीआय मेम्बरशीप कार्ड, त्यांच्या पतीचे व्हिजिटिंग कार्डचा समावेश होता.
त्यानंतर, दोघांनी एमआरए मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गाम्भीर्य लक्षात घेत तात्काळ शोध सुरु केला. घटनास्थळावरून सीसीटीव्हीचा शोध घेतला. एका सीसीटीव्हीमध्ये घटनाक्रम कैद झालेला दिसून आला. त्याच फुटेजच्या आधारे गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरु केला. रात्रभर राबविलेल्या शोध मोहिमेअंती सकाळच्या सुमारास आरोपीला पायधुनी येथून अटक केली आहे.आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे...मोहम्मद अरबाज अब्दुल सत्तार सिद्दकी (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो खासगी चालक म्हणून काम करतो. पायधुनीचा रहिवासी आहे. त्याच्या विरुद्ध एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात यापूर्वीही चोरीचा गुन्हा नोंद आहे. त्याच्याकडे याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे....