काळाघोडा परिसर चकाकणार; महापालिकेच्या ‘ए’ वॉर्डची पाच रस्ते सुशोभित करण्याची योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 09:34 AM2024-02-25T09:34:02+5:302024-02-25T09:34:16+5:30
सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे रस्ते फक्त पादचाऱ्यांसाठी राखीव असतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काळाघोडा परिसर म्हणजे मुंबईचे सांस्कृतिक दालन! या ठिकाणी अनेक हेरिटेज वस्तू आहेत, संग्रहालय आहे, विविध सांस्कृतिक उपक्रम इथे होत असतात. विविध कलाकारांचे कलाविष्कार इथे पाहायला मिळतात. त्यामुळे या भागात देशी-विदेशी पर्यटक, कलासक्त रसिक यांची वर्दळ असते. या मंडळींना या ठिकाणी आता आणखी मुक्तपणे फिरता येईल. या परिसरातील पाच रस्ते सुशोभित करण्याची योजना मुंबई महापालिकेच्या ‘ए’ वॉर्डने हाती घेतली आहे.
सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे रस्ते फक्त पादचाऱ्यांसाठी राखीव असतील. दिवसातून काही वेळच वाहनांना प्रवेश दिला जाईल. सुशोभीकरणानंतर या परिसराला आणखी झळाळी मिळेल. ऱ्हिदम हाऊस नजीकचे फोर्ब्स स्ट्रीट, रोप वॉकी लेन, साईबाबा रोड, रुथरफिल्ड रोड आणि बी-चर्चगेट रोड या पाच रस्त्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त जयदीप मोरे यांनी दिली. या कामांतर्गत आवश्यक तेथे रंगरंगोटी होईल, रोषणाई केली जाईल. सध्या या रस्त्यांचा मोठा भाग वाहनांनी व्यापला आहे. त्यामुळे लोकांना मुक्तपणे फिरत येत नाही. या ठिकाणी अधिकृत अशा पार्किंगच्या चार जागा आहेत. या वाहनांच्या पार्किंगसाठी अन्य जागेचाही शोध घेतला जात आहे.
असा आहे काळाघोडा परिसर
अनेक हेरिटेज इमारती, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी , नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, ता आर्ट ट्रस्ट- इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन आर्ट. काळाघोडा महोत्सव हे या परिसराचे मुख्य आकर्षण.
असे होईल सुशोभीकरण
बेसॉल्ट आणि ग्रेनाईटचा वापर करून डागडुजी.
विजेचे नवीन खांब आणि आकर्षक रोषणाई.
लँडस्केपिंग, आकर्षक फुलझाडे.
रस्त्याच्या पृष्ठभागावरील ड्रेनेज व्यवस्थेत सुधार.