तलाव भरू लागले; सात तलावांत ७६ दिवसांचा पाणीसाठा, सर्वाधिक पाऊस तुळशी तलावात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 06:22 AM2023-07-07T06:22:03+5:302023-07-07T06:22:12+5:30
सर्वाधिक पाऊस १,०८३ मिमी तुळशी तलावात पडला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत ३७० मिमी कमी आहे.
मुंबई : मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांत दररोज सरासरी पाऊस पडत असून, पाणीसाठा दिवसेंदिवस वाढत आहे. या तलावांमध्ये सध्या २,६४,६५७ दशलक्ष लिटर (१८.२९ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला असून, पाणीकपात लागू असल्याने पुढील ७६ दिवस म्हणजे १९ सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका आहे. सर्वाधिक पाऊस १,०८३ मिमी तुळशी तलावात पडला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत ३७० मिमी कमी आहे.
मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मुंबईसाठी संपूर्ण पावसाळा संपल्यानंतर म्हणजे १ ऑक्टोबर रोजी पुढील वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सात तलावांत मिळून एकूण १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असणे आवश्यक असते. जून महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नाही. तलावातील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली होती. ३० जूनपर्यंत तलावांत १,५७,४१२ दशलक्ष लिटर म्हणजे पुढील ४० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे १ जुलैपासून दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सध्या होत असलेल्या पावसामुळे तलावांची पातळी वाढू लागली आहे.