मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांचं गेल्या १० वर्षांपासून निर्जंतुकीकरणच केलेलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 03:29 PM2024-08-02T15:29:36+5:302024-08-02T15:31:14+5:30

Mumbai Lake Cleaning: तलावांमधून गाळ काढण्याचंही काम केलं गेलेलं नाही. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.

The lakes that supply water to Mumbai have not been disinfected for the last 10 years | मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांचं गेल्या १० वर्षांपासून निर्जंतुकीकरणच केलेलं नाही!

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांचं गेल्या १० वर्षांपासून निर्जंतुकीकरणच केलेलं नाही!

मुंबई

मुंबईला होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईकरांना ज्या तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो त्या तलावांमध्ये गेल्या १० वर्षांपासून निर्जंतुकीकरणच केलं गेलेलं नाही. यासोबतच या तलावांमधून गाळ काढण्याचंही काम केलं गेलेलं नाही. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. 

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. या जलाशयांमध्ये केल्या गेलेल्या गाळ काढण्याच्या कामाचा तपशील माहिती अधिकारातून मागवला गेला होता. पण त्यावर पालिकेकडून गेल्या १० वर्षांत या जलाशयांमध्ये गाळ काढण्याचं काम केलं गेलेलं नाही अशी माहिती समोर आली आहे. अर्थात जलाशयांमधील पाणी पालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध करुनच जलवाहिन्यांच्या मार्फत शहराला पुरवलं जातं. पण या जलसाठ्यातही गाळ काढणं आणि निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. 

नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बीएन कुमार यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या निर्जंतुकीकरण आणि गाळ काढण्याच्या कामाची माहिती मागवली होती. त्यावर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा या तलावांमध्ये कोणतंही गाळ काढण्याचं काम झालेलं नाही असं उत्तर पालिकेकडून देण्यात आलं आहे. 

"दरवर्षी मुंबईकरांना विशेषत: उन्हाळ्यात पाणी कपाताचा सामना करावा लागतो. याचं कारण काय? या प्रश्नावर विचार करुन आम्ही एक आरटीआय दाखल केला होता. या तलाव आणि जलाशयांमध्ये गाळ काढण्याचं काम केलं जातं की नाही याची माहिती मागवली होती. त्यावर पालिकेनं आम्हाला उत्तर दिलं की गेल्या १० वर्षांमध्ये या तलावांमध्ये कुठल्याही प्रकारचं गाळ काढण्याचं काम झालेलं नाही. तर यावर आमची मागणी अशी आहे की यावर एक संपूर्ण अभ्यास करावा. आम्ही मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं होतं. एका तज्ज्ञ समितीची नेमणूक करुन गाळ काढण्याची गरज किती आहे, कुठे करायची आणि किती करायची याचा विचार केला गेला पाहिजे", असं नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बीएन कुमार म्हणाले.

Web Title: The lakes that supply water to Mumbai have not been disinfected for the last 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.