वॉल्व्ह बंद करणाऱ्यांसाठी हाडे मोडण्याची भाषा; पालकमंत्र्यांना आव्हान नाही- जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 07:04 AM2022-03-17T07:04:37+5:302022-03-17T07:04:43+5:30
रविवारी आव्हाड यांच्या हस्ते वाघोबानगर येथे जलकुंभाचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबई : मला कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. परंतु, पाण्याचे वॉल्व्ह बंद करून जे महिलांना त्रास देत आहेत, ज्या व्यक्ती काही चुकीच्या गोष्टी करीत आहेत, त्यांची हाडे मी तोडून टाकणार आहे. यात मी कुठेही शिवसेनेवर किंवा कोणत्याही पक्षावर टीका
केलेली नसल्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे.
रविवारी आव्हाड यांच्या हस्ते वाघोबानगर येथे जलकुंभाचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी शनिवारी कोपरी येथे पक्षाच्या कार्यालयाचा शुभारंभदेखील त्यांच्या हस्ते झाला. वाघोबानगर येथे आपले विचार व्यक्त करताना जे वॉल्व्ह बंद करून पाण्यासाठी महिलांना त्रास देतात, अशांवर टीका केली होती. त्याचा विपर्यास करून प्रसिद्धिमाध्यमांनी चुकीचा अर्थ लावला आहे. तसेच कोपरीतदेखील लोक पर्यायाच्या शोधात असतात. आम्ही त्यांना समर्थ पर्याय देऊ, असे म्हटल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेसोबतच आघाडी
राष्ट्रवादी आणि शिवसेनेत राज्यात आघाडी आहे, तशीच ठाण्यातही आहे. मी कुठेही कोणत्याही पक्षावर टीका केलेली नाही. तसेच पालकमंत्र्यांनादेखील कुठल्या प्रकारे आव्हान दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. वाघोबानगर येथे जे पाण्याचे राजकारण करतात आणि तिथे वॉल्व्हमनची मोठी टोळी कार्यरत आहे. ते लोकांकडून हजारो रुपये लुटत असतात. ते बंद करण्यासाठीच मी पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम करीत आहे. त्यामुळे पाण्याचे वॉल्व्ह बंद करून टाकणाऱ्यांची हाडे मोडीन, असे वक्तव्य केले होते, असे त्यांनी सांगितले.