शस्त्र परवानाधारक पोलिसांच्या रडारवर; गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन अॅक्शन मोडवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:52 AM2024-04-01T10:52:44+5:302024-04-01T10:57:22+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परवानाधारकांकडून शस्त्रे प्रशासनाकडे जमा करून घेण्यात येत आहे
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परवानाधारकांकडून शस्त्रे प्रशासनाकडे जमा करून घेण्यात येत आहेत. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्याचा एक भाग म्हणून ही कार्यवाही केली जाते. उद्धव सेनेचे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणानंतर अन्य राज्यातील बंदूक परवान्यांवर मुंबईत सुरक्षा पुरविणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
म्हणून शस्त्रे जप्त...
१) लोकसभा निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील परवानाधारक शस्त्रे प्रशासनाकडे जमा करून घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्याचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात येत आहे.
२) आचारसंहिता लागताच ही कारवाई सुरू करण्याचे निर्देश आहेत. निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निर्देश लक्षात घेऊन जिल्हा छाननी समिती कोणाची शस्त्रे जमा करायची याचा निर्णय घेते. त्यानुसार त्यांची अंमलबजावणी सुरू आहे.
३) पूर्वी बंदुका बाळगणारे परवानाधारक हाताच्या बोटावर मोजण्याएवढे होते. गेल्या काही वर्षांत मात्र ही संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामागची राजकीय, सामाजिक कारणे अनेक आहेत. स्वसंरक्षणासाठी बंदुका बाळगणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
४) ११ हजार ५०० जणांकडे शस्त्र परवाना आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणारे राजकीय, व्यावसायिक, सुरक्षारक्षक यांच्याकडे शस्त्रांच्या परवान्यांची माहिती घ्यावी, त्याचबरोबर ज्यांच्या परवान्यांची मुदत संपलेली आहे, किंवा ज्यांच्याकडे परवानेच नाही, बोगस शस्त्र परवाने बाळगणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करावी, असेही आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.
मुंबईतील शस्त्र परवानाधारक- ११, ५००
परवाने रद्द : आतापर्यंत २२ हून अधिक जणांचे परवाने रद्द
शस्त्रे जप्त : १२ हून अधिक शस्त्र जप्त