मुंबई : मान्सूनकाळात मुंबईकरांना बत्ती गुलच्या समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी या चारही वीज कंपन्यांनी कंबर कसली असून, पावसाळा सुरु होण्यापूर्वीच देखभाल, दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे अशी तांत्रिक कामे करताना वीज पुरवठा खंडित करावा लागत असल्याने या संदर्भातील पूर्वसूचनाही वीज कंपन्यांकडून मुंबईकर ग्राहकांना दिली जात असून, मान्सून काळात अपघात होणार नाहीत याची अधिकाधिक खबरदारी वीज कंपन्यांकडून घेतली जात आहे. वितरण तसेच ग्राहक उपकेंद्रांमध्ये यंत्रे व उपकरणांची मान्सूनपूर्व तपासणी आणि बचावात्मक देखभाल केली जाते.
सोशल मीडियाचा वापर
पावसाळ्यात कोणती खबरदारी घ्यावी आणि काही आणीबाणी उद्भवल्यास काय करावे याच्या सूचना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जारी केल्या जातात. निवासी संकुलांमध्ये याविषयीची पत्रके वाटली जातात.
फीडर पिलर व जंक्शन बॉसमध्ये लीकेजच्या तपासण्या केल्या जातात.
वितरण आणि उपकेंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात डिवॉटरिंग पंप बसविण्यात येतात
ट्रान्सफॉर्मर, फीडर पिलर, मीटर रूमची उंची वाढविण्यात येते.
उपकेंद्रांमध्ये बचाव बोट, जीवनरक्षक जॅकेट्स पुरविण्यात येतात.
शहरात विविध ठिकाणी विशेष पथक सज्ज ठेवण्यात येतात.
पाणी साचण्याचा दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा ठिकाणी पाण्याची पातळी दर्शवणारे सेन्सर बसविले जातात.
मोक्याच्या ठिकाणी क्वीक रिस्पॉन्स टीमची नेमणूक केली जाते.
हे करा
मीटर केबिनमध्ये पाणी साठणार नाही किंवा तिथे पाण्याची गळती होणार नाही, याची काळजी घ्या.
सर्व दुरुस्ती पूर्ण केली गेली आहे, याची पूर्ण खात्री केल्यानंतरच मुख्य स्विच सुरू करा.
मीटर केबिनमध्ये पाणी साठत आहे किंवा पाण्याची गळती होत आहे हे लक्षात येताच, तातडीने मुख्य स्विच बंद करा.
फांद्यांच्या छाटणी
विजेच्या उपकरणांवर झाडे पडू नयेत, यासाठी उपकेंद्रांच्या जवळपास झाडांच्या वाढलेल्या फांद्यांच्या छाटणीसाठी विशेष मोहीम राबविली जाते.
पुरेसे सुटे भाग
ट्रान्सफॉर्मर, स्विचगीयर्स यासारखी उपकरणे आणि यंत्रे यांचा पुरेसा साठा तयार ठेवण्यात येतो, जेणेकरून वीजपुरवठ्यामध्ये काही अडथळा निर्माण झाल्यास तो कमीत कमी वेळेत दूर करता यावा.