- रेश्मा शिवडेकर(विशेष प्रतिनिधी)
अवघी दक्षिण मुंबई ७०-८०च्या दशकात रात्रीच्या सुमारास जिथे चिडीचूप होत असे, तिथे एका इमारतीतील लाइट मात्र कधीच बंद होत नाहीत. ती इमारत म्हणजे इन्स्टिट्युट ऑफ सायन्स. जिथल्या प्रयोगशाळांमध्ये कधीकाळी रात्रभर विद्यार्थी-प्राध्यापक कार्यरत असत. अशा या संस्थेला मधल्या काळात अवकळा आली होती. परंतु, आता पुन्हा एकदा ही संस्था कात टाकून विज्ञान-संशोधनातील आपले गतवैभव परत मिळवण्याच्या तयारीत आहे.ही संस्था म्हणजे १९२० साली ब्रिटिशांनी स्थापन केलेली मूळची रॉयल इन्स्टिट्युट ऑफ सायन्स.
१९९०च्या दशकात सरकारी अनास्था, निधीचा आटलेला ओघ, मेडिकल-इंजिनीअरिंगकडे वाढलेला कल यामुळे मूलभूत विज्ञानातील अध्ययन-संशोधन काहीसे मागे पडले आणि संस्थेला उतरती कळा लागली. आता एल्फिन्स्टन, सरकारी बीएड महाविद्यालय आणि सिडनहॅम अशा महाविद्यालयांच्या समूहासह मिळालेल्या होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या (एचबीएसयू) दर्जामुळे संस्थेला उर्जितावस्था मिळेल, अशी अपेक्षा आहे. यात संस्थेच्या पाठीमागे ४०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांचा संघ आहे. संस्थेला राज्य सरकारकडून नवीन इमारत उभारण्यासाठी ३६ कोटी ५६ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. याशिवाय संशोधनासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे घेण्याकरिता वेगळे ६ कोटी १० लाख सरकारकडून मंजूर झाले आहेत.
न्युक्लिअर केमिस्ट्रीची जुनी प्रयोगशाळा पाडून संस्थेची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेच्या तळघरात कॅलिफोर्निअम (२५२) प्रकारचा आण्विक स्रोत वर्षानुवर्षे बंदिस्त आहे. ५० वर्षांनी हा ‘न्युक्लिअर सोर्स’ ‘भाभा अणु संशोधन केंद्रा’तील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली अखेर सुरक्षितपणे येथून हलविण्यात येणार आहे.
इन्स्टिट्युट ऑफ सायन्सच्या इमारतीची वैशिष्ट्येनवीन इमारत पाच मजली असेल. संस्थेच्या हेरिटेज वास्तूचे वैशिष्ट्य जपणारी असेल. यात दीड हजार क्षमतेचे सभागृह असेल. याशिवाय प्रयोगशाळा, मुलींकरिता रेस्ट रूम, प्लेसमेंट सेल, उपाहारगृह, इंडस्ट्री इंटरॅक्शन सेल आदी सुविधा या ठिकाणी असतील. बेसमेंटला वाहनतळ असेल. संशोधनाच्या आधुनिक गरजा लक्षात घेऊन या प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती एचबीएसयूचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी दिली.
इतिहासब्रिटिश गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क (सिडनहॅम म्हणून ओळखले जात) यांच्या काळात सर कावसजी जहांगीर, सर जेकब ससून, करिमभॉय इब्राहिम आणि सर वासनजी त्रिकमजी मुळजी यांच्या देणगीतून संस्थेची उभारणी झाली. संस्थेचे पहिले तीन संचालक सीजे जे फॉक्स, टीएस व्हीलर आणि ए एन मेल्ड्रम हे ब्रिटिश होते.
हेरिटेज वास्तूसंस्थेच्या हेरिटेज वास्तूची रचना इंग्लंडमधील विज्ञान संस्थांसारखीच गॉथिक शैलीतील आहे. प्राध्यापकांच्या बैठकीच्या मागे प्रयोगशाळेला लागून खिडकी आहे. प्राध्यापकांना लागणारी उपकरणे, रसायने प्रयोगशाळेतील साहाय्यकाला देता यावी यासाठी ही खिडकी आहे. भारतातील सर्वात मोठी रसायनशास्त्र प्रयोगशाळा संस्थेत आहे.
मान्यवर माजी विद्यार्थीडॉ. होमी भाभा, एम. जी. के. मेनन, व्ही. व्ही. नारळीकर, आर. डी. देसाई, बी. एम. उद्गावकर, श्रीराम अभ्यंकर, माधव गाडगीळ, माधव चव्हाण आदी संशोधक तर के. एच. घरडा, के. जे. सोमय्या, डी. एम. खटाव, डॉ. किरण कर्णिक आदी उद्योजक माजी विद्यार्थी आहेत. माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या देखील संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत.