गुजरातचे सिंह आले मुंबईत, चंद्रपूरचे वाघ गेले गुजरातला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 11:45 AM2022-11-26T11:45:34+5:302022-11-26T11:47:41+5:30
सक्करबाग येथून आणलेल्या सिंहांचा जन्म जंगलातून पकडलेल्या सिंहापासून झालेला असून, त्याचे वय ३ वर्षे आहे. त्यामुळे पुढील अनेक वर्षे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना सिंह सफारीचा आनंद घेता येणार आहे.
मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुजरातच्या सिंहाची गर्जना पुन्हा एकदा ऐकू येणार आहे. कारण केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या परवानगीनंतर जुनागढ येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून सिंहाची एक जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आली आहे.
सक्करबाग येथून आणलेल्या सिंहांचा जन्म जंगलातून पकडलेल्या सिंहापासून झालेला असून, त्याचे वय ३ वर्षे आहे. त्यामुळे पुढील अनेक वर्षे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना सिंह सफारीचा आनंद घेता येणार आहे, तर दुसरीकडे चंद्रपूरच्या वाघाची मुंबईत असलेली जोडी गुजरातला रवाना होणार आहे. बजरंग आणि दुर्गा अशी या जोडीची नावे आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणांवरून या वाघांना पकडण्यात आले होते आणि नंतर मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हलविण्यात आले होते. दरम्यान, आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना सिंहाची जोडी पाहता येणार असल्याने उद्यान आणखी बहरणार आहे. दरम्यान, उद्यानात दाखल झालेल्या सिंहांची वैद्यकीय दृष्टीकोनातून देखील आता काळजी घेतली जाणार आहे.
गेल्या वर्षी रवींद्र या १७ वर्षीय सिंहांचा मृत्यू झाला. त्यानंतर उद्यानात ११ वर्षीय एकच नर शिल्लक राहिला आहे. तोदेखील वृद्धापकाळाने, आजाराने ग्रासला आहे. त्यामुळे पर्यटकांना तो दाखविता येत नाही.
- १९७५ - ७६ मध्ये उद्यानातील प्राणी संग्रहालयात लायन सफारी सुरू करण्यात आली.
- सुरूवातीला उद्यानातील सिंह हे मुख्यत: सर्कसमधील आशियाई आणि आफ्रिकन सिंहापासून जन्मलेले संकरित सिंह होते.
- केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या तपासणीत त्यांनी संकरित सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहांची संख्या कालांतराने कमी झाली.
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान १०६.९४ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे.
नर वाघ : नाव बजरंग : वय ६
मादी वाघ : नाव दुर्गा : वय ३
नर सिंह : नाव डी ११ : वय ३
मादी सिंह : नाव डी २२ : वय ३