मुंबई - महायुतीमध्ये जागावाटप निश्चित झालं असलं तरी अद्यापही सातार लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साताऱ्याच्या जागेवरुन चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती. मात्र, मागील चार दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. याबाबत स्वत: उदयनराजे भोसले यांनीही आज साताऱ्यात आल्यानंतर माहिती दिली आहे. मात्र, भाजपाची महाराष्ट्रातील तिसरी यादी आज जाहीर झाली, त्यातही साताऱ्याचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जागेवर आपला दावा करत असून भाजपानेही साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना आश्वासन दिलं आहे. त्यामुळे, साताऱ्यात नेमकं तिकीट कोणाला मिळणार, या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यातच, उदयनराजे आजि दिल्लीतून सातारा भूमीत आल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे, आज यादी जाहीर होईल, मी निवडणूक लढवणारच आहे, असे म्हणत उदयनराजेंनी उमेदवारीचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, भाजपाकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली. पण, या यादीत केवळ अमरावतीच्या जागेवरील उमेदवार नवनीत राणा यांचं नाव जाहीर झालं. त्यामुळे, उदयनराजे अद्यपही वेटिंगवरच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची माहिती दिली आहे. २८ मार्च रोजी आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जागावाटप आणि उमेदवारी जाहीर करू, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, उदयनराजेंचं नाव आजच्या यादीत जरी नसलं तरी उद्याच्या यादीत येऊ शकतं. मात्र, सर्वकाही पत्ते उद्याच उलगडले जाणार आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीकडेच आहे. त्यामुळे, साहजिकच येथील लोकसभा उमेदवार घड्याळाच्याच चिन्हावर निवडणुकीसाठी द्यावा, अशी कार्यकर्त्यांनी भावना असल्याचं संजीव नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे, सातारा जागा कोणाला मिळणार, हे उद्याच जाहीर होईल, असेच चित्र आहे.
साताऱ्यात आल्यावर उदयनराजे म्हणाले
"लोकांचं अलोट प्रेम पाहून मन भारावून गेलं. मी आयुष्यात राजकारण कधी केलं नाही. लोकांना केंद्रबिंदू मानून मी समाजकारण केलं. त्याचीच पोचपावती म्हणून आज लोक एवढ्या संख्येने उपस्थित आहेत. हे सगळं बघून काय बोलावं, हे मला सुधरत नाही. कालही मी जनतेसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. उमेदवार यादी आज जाहीर होईल. तो एक प्रक्रियेचा भाग आहे. पण सगळं निश्चित झालं आहे. मी निवडणूक लढणारच आहे," असा दावा त्यांनी केला आहे.